दैनिक स्थैर्य | दि. 20 डिसेंबर 2024 | फलटण | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहकार्य घेऊन भाडळी बु. येथील मातोश्री विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानुन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन बॅंकेचे प्रशासन विभागाचे निवृत्त उपव्यवस्थापक विश्वासराव परकाळे यांनी केले.
संस्थेचे सभासद हनुमंत सोनवलकर यांना शेती कामासाठी आवश्यक असणाऱ्या महिंद्रा ट्रॅक्टर साठी संस्थेने बॅंकेच्या माध्यमातुन अर्थसहाय्य केले असुन त्याचे वितरण नुकतेच परकाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅंकेचे माजी संचालक महादेवराव गुंजवटे, ताराचंद आवळे, सासकलचे माजी सरपंच सोपानकाका मुळीक, सुरेश चांगण, संजय शिंदे, संदीप शेंडे, राजेंद्र सोनवलकर, सचिव सचिन सोनवलकर यांच्यासह संस्थेचे संचालक, सभासद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत संस्थेचे संस्थापक चेअरमन मोहनराव डांगे यांनी केले तर ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप स्वप्नील शेंडे यांनी आभार मानले.