सागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद – मुख्यमंत्री

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.२० जानेवारी २०२२ । मुंबई । सागरी जैवविविधतेचे रक्षण करताना ऑलिव्ह रिडले कासव, बहिरीमासा लांजा मासा ग्रीन कासव अशा एकूण २६० संरक्षित सागरी प्रजाती ज्या मासेमारी करतांना मच्छिमारांच्या जाळ्यात अडकल्या होत्या त्यांना मच्छिमारांनी सुखरूपपणे समुद्रात सोडले आहे. असे करताना त्यांच्या झालेल्या जाळ्यांच्या नुकसानीपोटी कांदळवन प्रतिष्ठानने त्यांना ४० लाख ७८ हजार ०५० रुपयांची नुकसान भरपाईही दिली आहे.

सागरी जैवविवितधेच्या रक्षणासाठी कांदळवन कक्ष करत असलेले काम कौतुकास्पद असूनअशाचप्रकारे राज्यातील जैवविविधतेच्या जपणुकीसाठी गांभीर्याने प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे तसेच यासाठी आवश्यक असलेली व्यापक जनजागृती केली जावी, स्थानिकांना यासाठी विश्वासात घेऊन काम करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

कांदळवन संरक्षणासाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी पाऊले – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

राज्यातील कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी शासनाने अतिशय महत्त्वाकांक्षी पाऊले टाकली असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. ते म्हणाले की, यात कांदळवन उपजीविका निर्माण, कांदळवन वनीकरण, कांदळवन निसर्ग पर्यटन, कांदळवनावरील अतिक्रमणे हटवणे आणि इतर उपक्रमांचा समावेश आहे. राज्यात कांदळवनाचे ३२ हजार हेक्टर आच्छादन आहे. या समृद्ध कांदळवनाचे संरक्षण करताना कांदळवनांना राखीव वनाचा दर्जा देण्याचे काम सुरु असून भारतीय वन अधिनियमातील कलम ४ नुसार २५१४.११ तर कलम २० अंतर्गत ९७८५.३६ हेक्टर इतके कांदळवन राखीव वने म्हणून घोषित करण्यात आले आहे. एमएमआर क्षेत्रात कांदळवनांच्या संरक्षणासाठी संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरु आहे.. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून भारतीय वन सर्व्हेक्षण अहवाल २०२१ नुसार राज्यातील राज्यातील कांदळवन क्षेत्रात ४ चौ.कि.मीची वाढ झाली आहे, विविध शासकीय व खासगी विभागाकडील कांदळवने हस्तांतरीत करून घेण्याची प्रक्रिया अजूनही काही ठिकाणी सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सागरी प्रजातींच्या संरक्षणासाठीची उपाययोजना

सागरी जैवविविधतेच्या संवर्धनात स्थानिक मच्छिमारांचा नेहमीच महत्त्वाचा सहभाग राहिला असून शाश्वत मासेमारी करताना दुर्मिळ आणि संरक्षित प्रजातींचे रक्षण होईल याकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे यासाठी वन व मत्स्यव्यवसाय विभाग यांनी संयुक्तरित्या नुकसान भरपाईची योजना डिसेंबर २०१८ पासून राबविण्यात सुरुवात केली. या योजनेंतर्गत आतापर्यंत १३८ ऑलिव्ह रिडले कासव, ६७ ग्रीन सी कासव, ५ हॉक्सबिल कासव, २ लेदरबॅक समुद्री कासव, ३७ बहिरी मासा (व्हेल शार्क), ६ लांजा (जाअंट गिटारफिश) एक गादा ( हंप ब्याक डॉल्फिन) ४ बुलीया (फिनलेस पोर्पोईस) अशा  २६० दुर्मिळ प्रजातींना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले आहे.

मागील १५ दिवसात

मागील पंधरा दिवसात अशा ३८ प्रकरणात ५ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम कांदळवनकक्षाकडून देण्यात आली आहे ज्यामध्ये २६ ऑलीव्ह रिडले कासव, ६ बहिरी मासे, २ लांजा मासे, १ ग्रीन सी कासव, १ हॉक्सबिल कासव व १ बुलीया यांना मच्छिमारांनी सुखरूप समुद्रात सोडले आहे. या आर्थिकवर्षात अशाप्रकारे ८६ प्रकरणात मच्छिमारांना ११ लाख ५२ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई कांदळवन कक्षामार्फत देण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!