दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑगस्ट २०२२ । फलटण । आजादी का अमृत महोत्सव साजरा करताना घर घर तिरंगा योजना राबविण्यासाठी जाधववाडी (फ) ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना राष्ट्रीय ध्वज उपलब्ध करुन देण्यासाठी उभारलेला स्टॉल आणि त्यासाठी उभारलेली प्रसिध्दी, प्रचार यंत्रणा प्रेरणादायी असून जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतींनी या छोट्या ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्रीमती अर्चना वाघमळे यांनी केले आहे.
जाधववाडी (फ) ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभारलेल्या राष्ट्रध्वज वितरण केंद्राचा शुभारंभ उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्रीमती अर्चना वाघमळे यांच्या हस्ते काही ग्रामस्थांना राष्ट्रध्वज वितरण करुन करण्यात आला. त्यावेळी गट विकास अधिकारी तथा प्रशासक डॉ. अमिता गावडे पवार, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
जाधववाडी (फ) ग्रामपंचायतीने वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, ग्रामपंचायत कर वसूली, स्वच्छ पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा वगैरे नागरी सुविधांबाबत केलेले काम उत्कृष्ट असल्याचे नमूद करीत उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्रीमती अर्चना वाघमळे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या
प्रारंभी ग्रामविकास अधिकारी विजयराव निंबाळकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर ग्रामपंचायतीच्या प्रगतीचा अहवाल सादर करुन विविध शासकीय योजना तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर प्रभावी रितीने राबवून मिळविलेल्या पुरस्कारांची माहिती दिली. विशेषत: वृक्षारोपण साठी बिहार पॅटर्नच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यशस्वी करताना गरजूंना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिल्याचे निदर्शनास आणून दिले.
फोटो : ग्रामस्थांना राष्ट्रध्वज वितरणाचा शुभारंभ करताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्रीमती अर्चना वाघमळे, शेजारी गट विकास अधिकारी तथा प्रशासक डॉ. अमिता गावडे पवार, सरपंच, उप सरपंच, ग्रामविकास अधिकारी विजयराव निंबाळकर व ग्रामपंचायत सदस्य.