सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत असतात : डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ जानेवारी २०२३ । फलटण । राष्ट्रीय सेवा योजना ही एक युवा चळवळ, युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे गर्व्हनिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य यांनी केले.

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष श्रमसंस्कार शिबिर सन २०२२-२३ मौजे जावली, तालुका फलटण, जि. सातारा येथे दि. १६ जानेवारी २०२३ रोजी शिबिर उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे गर्व्हनिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य हे त्यावेळी बोलत होते.

आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते तसेच देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना त्यात सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. विशेषत: शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात असे प्रतिपादन श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटणचे आदरणीय प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी व्यक्त केले.

‘Not me, but you’ माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये आणि सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो. आपले उज्ज्वल भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो म्हणून फूल ना फुलाची पाकळी या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवक करीत असतो असे प्रतिपादन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मिलिंद नातु यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाव्दारे स्वंयसेवकानी मौजे जावली गावामध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी यासाठी जावली गावातील युवक व ग्रामस्थ तत्पर व सक्षम व्हावा, यासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण पुरस्कृत राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत नियमित कार्यक्रम व विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर या दोन उपक्रमांद्वारे समाजप्रबोधन करण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन मौजे जावली गावचे सरपंच मा. सौ. ज्ञानेश्वरी मकर यांनी केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. विशेषत: शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात. शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढताना दिसून येते तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मौजे जावली गावांमध्ये उत्कृष्ट काम करतील असा आशावाद श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथील महाविद्यालयीन समितीचे चेअरमन शरदराव रणवरे यांनी व्यक्त केले.

सदरील श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य तथा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, जावलीचे चेअरमन राजकुमार गोखले, जावली गावातील युवक, महिला भगिनी, ग्रामपंचायत सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!