दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२३ | फलटण |
उद्योगपती अशोकशेठ सस्ते यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असेच आहे, असे प्रतिपादन शंभूराजे खलाटे यांनी केले आहे.
सस्तेवाडी (ता. फलटण) गावातील मुक्ताई मंगल कार्यालयामध्ये आशा वर्कर्सना साडी वाटप व धोंडे पोळ्यांच्या जेवणाचे उद्योगपती अशोकशेठ सस्ते यांच्या वतीने १३ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
सस्तेवाड़ीतील मुक्ताई मंगल कार्यालय एकूण ५०० आशा वर्कर्संच्या उपस्थितीने भरगच्च भरलेला होता. त्याचबरोबर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी व पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली होती.
खलाटे म्हणाले की, कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणार्या आशाताईंचा साडी व पुरणपोळीचे जेवण धोंड्याच्या महिन्यात देऊन अशोकशेठ सस्ते यांनी एकप्रकारे पुण्याचेच काम केले असून त्यांनी आशाताईंना काम करण्यासाठी बळच दिले आहे. अशोकशेठ सस्ते यांनी अनेक सामाजिक कार्य केली आहेत. त्यामध्ये गोरगरीबांना आजारपणात मदत, शस्त्रक्रियेसाठी मदत, शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप, दप्तरे वाटप, गोरगरीब फलटण तालुक्यातील १५००० महिलांना मोफत शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर महालक्ष्मी देवी, शनि शिंगणापूर दर्शन घडवून आणले आहे.
यावेळी अशोकशेठ सस्ते म्हणाले की, तुटपुंज्या पगारावर आशाताई जीवाची पर्वा न करता तुम्ही काम करत आहात. तुमच्या मानधन वाढीसंदर्भात मी शासनस्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आवर्जून यावेळी सांगितले. सेवानिवृत्त सह्याद्री पतसंस्थेचे मॅनेजर आत्तार शेख यांचा यावेळी चांगल्या कामाबद्दल सपत्नीक सत्कार सस्ते कुटुंबाच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमात शंभूराजे खलाटे, पत्रकार निलेश सोनवलकर, पत्रकार सुरेश भोईटे, आशा वर्कर्स यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.
सूत्रसंचालन शंभूराजे खलाटे यांनी केले तर आभार पत्रकार सुरेश भोईटे यांनी मानले.