उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन; आरटी-पीसीआरसह सर्व उपाययोजनांसंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२१ । मुंबई । महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन दिनांक 22 डिसेंबरपासून विधान भवन, मुंबई येथे सुरू होत असून अधिवेशन संदर्भातील आरटी-पीसीआर चाचणी, सुरक्षा, कोविड प्रतिबंधात्मक कार्यवाही, सभागृहातील आसन व्यवस्था, अग्निसुरक्षा, उपहारगृह या उपाययोजनांसंदर्भात महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्री.रामराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष श्री.नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.

ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना सभापती श्री.नाईक-निंबाळकर यांनी दिल्या. सोमवार, दिनांक २० डिसेंबर रोजी एकूण २६७८ जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली, त्यापैकी ८ जणांची चाचणी सकारात्मक आली आहे. लसीचे दोन्ही डोस आणि त्याचबरोबर आरटी-पीसीआर चाचणी विधान भवन प्रवेशासाठी बंधनकारक आहे.

अधिवेशन कालावधीत गर्दी होऊन संसर्ग वाढू नये यासाठी अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नसून स्वीय सहायकांसाठी बसण्याची व्यवस्था विधान भवनासमोरील वाहनतळ आवारात स्वतंत्र मंडप टाकून करण्यात आली आहे. मंत्री यांच्या आस्थानपनेवरील कर्मचारी यांनादेखील अत्यंत मर्यादित संख्येने प्रवेश देण्यात येत आहे.

विधानसभा सभागृहामध्ये सुयोग्य अंतर राखण्याच्या दृष्टीने अधिवेशन कालावधीमध्ये सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था एक आसन सोडून करण्यात आली असून गतवर्षीप्रमाणेच सभागृहाच्या गॅलरीमध्ये देखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानपरिषद सभागृहामध्ये आसन व्यवस्था पुरेशी असल्यामुळे सन्माननीय सदस्यांची बसण्याची व्यवस्था सभागृहामध्येच करण्यात आली आहे. विधानसभा, विधानपरिषद व मध्यवर्ती सभागृहामध्ये निगेटिव्ह प्रेशर यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

या बैठकीस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री. राजेन्द्र भागवत, सह सचिव (समिती) डॉ. अनिल महाजन, उप सचिव श्री. राजेश तारवी, अवर सचिव श्री. रविंद्र जगदाळे, पोलीस दल, वैद्यकीय विभाग, अग्निशमन यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!