गिरवीत ‘राजे गटा’ला सुरुंग; ३०० कार्यकर्त्यांचा समशेरदादांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश

जाधववाड्याचा पाणीप्रश्न आणि समाजमंदिराचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार; आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंहांची ग्वाही


स्थैर्य, फलटण, दि. २ फेब्रुवारी : कोळकी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या तोंडावर गिरवी गावात राजकीय भूकंप झाला आहे. राजे गट प्रणित शिवसेनेला मोठा धक्का देत गिरवीतील जाधववाडा येथील तब्बल ३०० कार्यकर्त्यांनी फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे कोळकी गटातील भाजपाचे उमेदवार जयकुमार शिंदे आणि पंचायत समितीचे उमेदवार विकास नाळे यांची बाजू कमालीची भक्कम झाली असून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

यावेळी आयोजित सभेत फलटणचे आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह स्थानिक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – समशेरसिंह

प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, “जाधववाडा आणि गिरवी परिसरातील जनतेने विकासाच्या मुद्द्यावर भाजपावर विश्वास दाखवला आहे. जाधववाडा येथील अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न आम्ही प्राधान्याने मार्गी लावू. गिरवी गावाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समिती आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही.”

पाणी प्रश्न आणि समाजमंदिरासाठी आमदार सचिन पाटील सरसावले

आमदार सचिन पाटील यांनी यावेळी जाधववाडा रहिवाशांना ठोस आश्वासन दिले. ते म्हणाले, “येथील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, हे मला ठाऊक आहे. लिफ्टद्वारे पाणी आणण्यासाठीची योजना आम्ही तात्काळ आखणार आहोत. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी लागणारा सर्व निधी मी स्वतः लक्ष घालून मंजूर करून आणणार आहे. येथील जीर्ण झालेल्या समाजमंदिराचा जिर्णोद्धार करून तिथे सर्व आधुनिक सोयी-सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

भाजपाची ताकद वाढली, विरोधक बॅकफूटवर

कोळकी जिल्हा परिषद गटात जयकुमार शिंदे यांच्या विरोधात सह्याद्री चिमणराव कदम, तर पंचायत समिती गणात विकास नाळे यांच्या विरोधात डॉ. अशोक नाळे रिंगणात आहेत. मात्र, गिरवीसारख्या महत्त्वाच्या गावात एकाच वेळी ३०० लोकांनी ‘राजे गट’ सोडून भाजपात प्रवेश केल्याने ही निवडणूक आता एकतर्फी होण्याची चिन्हे आहेत. जयकुमार शिंदे यांचा अनुभव आणि विकास नाळे यांची तळागाळातील कामाची ओढ यामुळे या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्व ताकद पणाला लावणार असल्याचा निर्धार यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.

या पक्षप्रवेशामुळे गिरवी परिसरात भाजपाच्या ‘कमळ’ चिन्हाचा जयघोष होत असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील ही मोर्चेबांधणी यशस्वी होताना दिसत आहे.


Back to top button
Don`t copy text!