स्थैर्य, मायणी. दि. 15 : मायणीसह तारळी कालव्याच्या ओलिताखाली येणार्या भागातील शेतकर्यांसाठी आजचा सोन्याचा दिवस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण तारळीचे पाणी मायणी परिसरात आले, हे स्व. भाऊसाहेब गुदगे यांचे दूरदृष्टीचे फलित असून त्यांचे स्वप्न साकार झाल्याचे प्रतिपादन मायणी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले.
वर्षानुवर्षे दुष्काळग्रस्त म्हणवून घेणार्या खटाव-माण भागातील शेतकर्यांना आज तारळी, उरमोडी, टेंभू, जिहे कटापूरचे पाणी उपलब्ध होत आहे. हा शेतकरी आज आपल्या कोरड्या माळावर या सिंचन योजनांच्या जीवावर बागायती पिके घेऊ लागला आहे. धोंडेवाडी, ता. खटाव येथील जलसेतूचे काम पूर्ण झाले. मायणीच्या शिवारात येण्याचा मार्ग मोकळा झाला. मायणीच्या माळीनगर येथे तारळीच्या पाण्याचे आगमन झाले व गावकर्यांनी एकच जल्लोष केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त रामराजे नाईक-निंबाळकर,जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सहकार्यातून मिळालेली ही अमूल्य भेटच म्हणावी लागेल. ते म्हणाले भाऊसाहेब गुदगे यांनी 1985 ते 2004 या वीस वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये खटाव तालुक्याच्या दुष्काळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाणी योजनांचा पाया घातला. उरमोडी, टेंभू, तारळी जिहे कटापूर या योजनांची प्रशासकीय मान्यता त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाली. त्याच वेळेस पाठपुरावा करून त्यांनी या सर्व योजनेत खटाव तालुक्याचा समावेश करून घेतला. 1992 मध्ये 212 कोटीची प्रशासकीय मान्यता घेतलेल्या उरमोडीमधून तीन टीएमसी पाणी खटावसाठी व तीन टीएमसी पाणी माणसाठी राखून ठेवले. त्यामुळे खटावमधील जवळपास तीस हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आले. 1996 मध्ये 194 कोटीची मूळ प्रशासकीय मान्यता घेतलेल्या तारळीमध्ये त्यांनी कातरखटाव-मायणी परिसराचा समावेश करून घेतला. त्यामध्ये खटावमधील 4438 हेक्टर व माण तालुक्यातील 4438 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. या योजनेची चौथी सुधारित मान्यता 1610.32 कोटीची आहे.
गतवर्षी कातरखटाव परिसरात सूर्याचीवाडी,, धोंडेवाडीपर्यंत हे पाणी पोहचले होते. यावर्षी ते मायणी परिसरात पोहचले आहे. स्व. भाऊसाहेबांनी या योजनेत खटावचा समावेश केल्यानेच पाणी पाटांमध्ये वाहत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे चेहरे समाधानाने फुलले असून ते स्व. भाऊसाहेबांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. मायणीच्या शिवारात आलेल्या पाण्याचे महिलांनी पूजन केले व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.