
दैनिक स्थैर्य । 10 मार्च 2025 । फलटण । धोमबलकवडीचे पाणी वाखरी गावातील इरिगेशन तलावात पाणी न सोडल्यास उपविभागीय कार्यालय समोर आत्मदहन करण्याचा इशारा वाखरी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी (धोम बलकवडी) यांना दिला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रब्बी हंगामातील पाणी वाखरी जवळील इरिगेशन तलावात सोडण्यात येते. यामुळे लाभक्षेत्रातील वाखरी, शेरेचीवाडी, वाठार निंबाळकर, जोरगाव या सर्व गावांना प्रामुख्याने लाभ होतो. पाटबंधारे विभागाने लाभ क्षेत्रात बसत नसणार्या गावाना पाणी दिलेले आहे. परंतु जाणीवपूर्वक वाखरी गावातील तलावात पाणी सोडले नाही. पाणी नाही सोडले तर गावाला टँकर सुरु करावे लागतील. पाणी न सोडल्यास वाखरी ग्रामस्थ हे आत्मदहन करणार आहेत.
तलावातील पाण्यावर अवलंबून अंदाजे 2000 एकर क्षेत्र आहे. तसेच तलावाच्या खालील बाजूस ग्रामपंचायत ची पाणी पुरवठा विहीर आहे. व त्यावर संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आपण लवकरात लवकर पाणी सोडावे. त्वरीत लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा. गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. पिक आहे जळून जातील. शेतक-यांचे नुकसान होईल जनावरांना पिण्याचे पाणी व चारा याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. हक्काचे पाणी आम्हांला मिळावे. चार दिवस उशिरा का होईना परंतु त्यां अडचणीचे निवारण झाले नंतर आमचे पाळीचे पाणी आम्हांला मिळाले पाहिजे होते पण तसे न करता त्यांनी पाणी पुढे देण्यास सुरुवात केली तरी ते बंद करून आम्हांला आमचे हक्काचे पाणी मिळावे.
निवेदनावर संतोष ढेकळे, संदीप ढेकळे, विकास शिंदे, सचिन गायकवाड, सुहास शिंदे. राहूल रिटे, गणपत जाधव, अजित शिंदे, प्रल्हाद जाधव, ज्योतिराम मोहिते, दत्तात्रय मोहिते, गणपत मोहिते, उत्तम जाधव, नवनाथ ढेकळे, सुनिल मोटे, किसन मोहिते, दयानंद मोहिते, प्रशांत ढेकळे आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
या निवेदनाच्या प्रती तहसिलदार, पोलिस निरिक्षक, ग्रामीण पोलिस स्टेशन तसेच गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.