दैनिक स्थैर्य । दि.२० नोव्हेंबर २०२१ । सातारा । स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी बांधलेला हा वाईचा कृष्णा पुल आता दीडशे वर्षानंतर नव्याने बांधण्यात येणार आहे.हा पूल पाडण्यास आज शुक्रवार (दि१९) पहाटे पासून पाडण्यास सुरवात झाली. यामुळे वाईकरांच्या मनात पिढ्यांपिढ्यांचा ठेवा आणि सुखदुःखातील भागीदार गेल्याने अस्वस्थता आणि भावनिक कोलाहल निर्माण झाले आहे.
सुमारे १३० वर्षांपूर्वी कृष्णा नदीवर शहराचे दोन भाग एकत्र जोडण्यासाठी बांधलेला पुल जास्त काळ उलटूनही आजही वाईमध्ये भक्कमपणे आणि दिमाखात उभा आहे. दुरदृष्टीसोबत या पुलाला सौंदर्यदृष्टीचीही जोड आहे. मात्र ब्रिटिश सरकारने पंचवीस वर्षांपूर्वी या पुलाचे आयुष्य संपलेले असून हा पूल वाहतुकीतून दळनवळणातून वगळण्यात यावा असे पत्र पालिकेला पाठविण्यात आले होते.तेव्हा पासून नागरीकांच्या पूल कधीतरी पडणार या कल्पनेने ही दुःख झाले.वाईचा कृष्णा नदीवरचा मोठा पूल सेवानिवृत्त होतोय.सुरूर ते फिट्झगेराल्ड घाट (आंबेनळी घाट) या प्रमुख रस्त्यावर, इंग्रजांनी दळणवळणाच्या उद्देशाने वाईच्या कृष्णा नदीवर हा दगडी पूल बांधला. १८७१ साली हा पूल बांधून पूर्ण होऊन वाहतुकीसाठी चालू झाला. या पूलाची लांबी २६६ फूट, रुंदी २० फूट तर उंची ३६ फूट इतकी आहे. तत्कालीन काळात या पूलाच्या बांधकामास ३९,३१० रुपये इतका खर्च आला. आजमितीला या पूलाला १५० वर्षे पूर्ण झालेली आहेत. वाईच्या वैभवात भर घालणारा हा पूल, वाईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय.विकासाच्या नावाखाली हा पूल पाडला जातोय. नक्कीच सर्वांना वाईट वाटतंय.
स्वातंत्र्याची चळवळ, अनेक आंदोलने,धार्मिक,विद्यार्थी मिरवणुका,शाळेत रुग्णालयात जाण्यायेण्याचा मार्ग, तहसीलदार कार्यालयावर मोर्चा,पावसाळ्यात येणाऱ्या महापुर अशा अनेक आठवणींचा खजिना पुलाशी असणारे भावनिक नाते याबाबत सध्या समाज माध्यमावर जोरदार चर्चा सुरु आहे.नवीन पुल बांधण्यासाठी आजूबाजूला जागाच उपलब्ध नाही म्हणून हा पुल पाडावा लागतोय
मात्र पालिकेचे मर्यादित आर्थिक उत्पन्न,शासनाकडून मिळणारा तटपुंजा निधी यामुळे हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करून सुरूच ठेवण्यात आला होता.
वाई पालिकेची सातत्यपूर्ण येणारी मागणी विचारात घेऊन हा पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने या पूल पाडण्यास शुक्रवार सुरवात झाली.पालिकेने आजच तसे नागरिकांना कळविले आहे.पूल बांधकाम सुरू असताना वाहतूक कोंडी टाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.या पुलाशी नागरिकांचे फारच भावनिक नाते असल्याने पूल पडण्याचा विषयावरून नागरिकांच्या मनात फारच भावनिक कोलाहल सुरु आहे.राजकीय पक्षांनी पूल पाडण्यास विरोध केला असून तसे निवेदन प्रांताधिकारी,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते.बदल ही काळाची गरज आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाने नवीन पूल तयार ही होईल. पण जुना मोठा पूल वाईकरांच्या सदैव स्मरणात राहील.