दैनिक स्थैर्य । दि. 08 डिसेंबर 2021 । फलटण । सध्या ऊसतोडीच्या निमित्ताने खानदेश व मराठवाडा या ठिकाणाहून अनेक ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडीसाठी आलेले आहेत. मागील चार दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ऊसतोड कामगारांचे प्रचंड मोठे हाल झाले. पावसामुळे ऊस तोडणीही थांबवावी लागली. त्यामुळे या कामगारांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. आपल्या उदरनिर्वाहासाठी येणार्या या ऊसतोड कामगारांना नियमित काम असणे अत्यंत गरजेचे असते. पावसामुळे ऊसतोड करणे अशक्य झाल्याने बर्याच गावांमधून या कामगारांना कामाविनाच रहावे लागले. अशा परिस्थितीत कामगारांना काही दिलासा देण्याच्या उद्देशाने फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी (ढ) येथील समाजप्रेमी युवक व ग्रामस्थांनी या कामगारांसाठी अन्नदानाची व्यवस्था करून मोठा आदर्श निर्माण केला.
शेरेचीवाडी (ढ) येथे सध्या परिसरातील विविध कारखान्यांच्या ऊसतोड कामगारांच्या टोळ्या वास्तव्यास आहेत. जवळपास 250 कामगार यानिमित्ताने गावांमध्ये आलेले आहेत. या सर्वच कामगारांना स्नेहभोजनाची व्यवस्था गावातील युवक आणि ग्रामस्थ यांनी मिळून केली. यामुळे ऊसतोड कामगारांना ग्रामस्थांनी दिलेल्या या सुखद कार्याचे फार कौतुक वाटले. याबद्दल कामगारांनी ग्रामस्थांचे विशेष आभार व्यक्त केले.
फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी(ढ) हे गाव नेहमीच सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये अग्रेसर असते. आजवर विविध समाजोपयोगी कार्यातून गावच्या युवकांनी वेगळा आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे. मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, व्याख्यानमाला, गावातील कर्तुत्ववान नागरिकांचा सन्मान, आदर्श अधिकार्यांचा सन्मान अशा विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणार्या या शेरेचीवाडी (ढ) गावांने ऊसतोड कामगारांसाठी दिलेल्या योगदानाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.