
दैनिक स्थैर्य । दि. ०१ फेब्रुवारी २०२३ । सातारा । परंपरेने चालत आलेले गाव आता बदलायला पाहिजे. सामाजिक आणि आर्थिक विषमता देशात मोठ्या प्रमाणात आहे. व्यसनाची लागण शहरातून आता गावापर्यंत आली असून दारूच्या बाटल्या खळाळ वाहत आहेत.
आणि यात अनेक तरूण अडकत असून घराची व समाजाची मोठी बरबादी होण्याची शक्यता आहे. शिक्षण घेऊनही आपल्या आशा पूर्ण होतील कि नाही या काळजीने अनेक सुशिक्षित बेकार आता म्हातारे होऊ लागले आहेत. भातिक समृद्धी होत असताना मने फाटू लागली आहेत,लोकसंख्या वाढत असून भ्रष्टाचार देखील थांबलेला नाही. देव देवळे आणि मंदिरे आता न बांधता गावागावात संविधान सभागृह बांधून गावाने आपल्या सार्वजनिक उन्नतीचे कार्यक्रम आखून प्रश्न सोडवले पाहिजेत. जातीभेदाने निर्माण केलेली आपसातली घृणा दूर करून माणुसकी निर्माण करणारे कार्यक्रम ठेवले पाहिजेत. ढोंगी बुवा बाबा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.धर्माची आवाहने करून लोकांना भ्रमात ठेवले जात आहे.अशावेळी समाजसुधारक यांचा वारसा घेऊन काम केले पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील रयत
सेवक होते,डॉ.नरेंद्र दाभोलकर विवेकवादी विचारवंत होते, फुले विचारधारेने सत्यशोधक बनवले,शिक्षण दिले. संत गाडगेबाबा यांनी देवळात देव नसतो असे सांगितले .जनता जनार्धन आणि त्याची सेवा हे त्यांचे काम होते. या प्रकारचे विचार घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी भारत सक्षम ,वैज्ञानिक दृष्टीकोन वादी करायला हवा.गावात हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यापेक्षा वैचारिक जागृती व जाणीव निर्माण करणारे कार्यक्रम घ्यायला हवेत. प्रत्येक गाव श्रद्धा आणि अंधश्रद्धेत आहे आता ते संविधानाच्या मार्गाने पुढे न्यायला हवे असे मत प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे अग्रणी कॉलेज असलेल्या यशवंतराव चव्हाण
इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेजने खेड[नांदगिरी ] येथे आयोजित केलेल्या एन.एस.एस. शिबिरात’ संविधांनाच्या स्वप्नातलं गाव : आपली जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी भास्कर शिवाजी कदम होते.तसेच सुरेश घनवट,दत्तात्रय कदम,किशोर म्हमाणे, प्रकल्प कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एन.बी.माने प्रा.आर.व्ही.यादव,डॉ.आर.व्ही.हंगारगे,.डॉ.मनीषा पाटील,डॉ.अनिता माळी इत्यादी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ‘युवकांचा ध्यास : ग्राम शहर विकास’ हे ब्रीद वाक्य घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संविधानातील मूल्य विचार अजूनही जनतेत नीट पाझरलेला नाही हे सांगताना ते पुढे म्हणाले की ‘’ भारत नावाचा देश १९५० पासून खऱ्या अर्थाने जन्मला आहे. भारतीय लोकशाहीला ७४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या देशातल्या पोटापाण्याच्या समस्या अजूनही संपलेल्या नाहीत.त्यामुळे संविधान समजून घ्यायला आणि द्यायला कोणी तयार नाही. लोक जागरूक व जबाबदार नागरिक झालेत असे म्हणवत नाही. कारण जे प्रतिनिधी निवडून देतो त्यांच्याकडून कोणी मत देण्यासाठी पैसे मागत असेल आणि ते देखील देत असतील तर ही विचारी चांगली लोकशाही आहे का प्रश्न आहे. अशाने केवळ ज्याच्याकडे पैसा आहे तेच लोक निवडून येतील म्हणूनच लोकशाहीत नीतिमान
नागरिक घडवणे आवश्यक आहे. पण हे कोण करणार ? ही जबाबदारी शिक्षण व्यवस्था ,समाज व्यवस्था ,कुटुंब घेणार आहे का ? याचा विचार राष्ट्रीय सेवा योजना करणार आहे का? एन.एस.एस.ची शिबिरे लोकांच्या सहभागाने व्हायला हवीत.ती नुसती श्रमदान करण्यासाठी करू नयेत. चांगले घडवण्यासाठी मेंदू जागे कधी होणार ?सर्वांचे मेंदू विधायक विचार व कृती करण्यासाठी घडवणे हेच काम एन.एस .एस. मध्ये व्हायला हवे. स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय याबाबतचे भारतीय संविधानाचे धोरण समजून घेतले पाहिजे.स्वातंत्र्य चळवळीतून आलेल्या आदर्शाचे पालन करणे ,देशाचे एकात्मता व अखंडत्व यांचे सुरक्षित ठेवणे,बहुसांस्कृतिक वारसा जतन करणे, निसर्ग पर्यावरण चांगले ठेवणे,देशातील नागरिकात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे,संशोधन करण्याची दृष्टी वाढवणे,हिंसेचा त्याग
करणे,देशाच्या प्रगतीसाठी झटून प्रयत्न करणे ..ही कर्तव्ये का करायची याबद्दल लोकांना गावात प्रशिक्षण दिले पाहिजे. गावच्या निवडून दिलेल्या प्रतिनिधीनी हे भान ठेवून गावात बदल करायला हवेत. गाव पारंपरिक असते तेंव्हा जाती अलगता तशीच राहते. हे बदलण्यासाठी आपण काम करावे.गावात समता आली पाहिजे यासाठी चांगले विचार आणि आचार आवश्यक असतात. आज धर्मांध संघटनानी देशात काहीतरी कुरापती काढून विद्वेष प्रसारण सुरु केले आहे. याबाबत प्रत्येक नागरिकास माहिती द्यायला हवी.सर्व भारतीय लोक सुखी राहण्यासाठी एकोप्याचे आणि सामाजिक न्यायाच्या विचाराची मांडणी सतत चालू ठेवायला पाहिजे असेही ते म्हणाले.
या व्याख्यानाचे प्रास्ताविक व परिचय प्रा.डॉ.एन.बी.माने यांनी करून दिला. प्रवीण कोळपे व आदेश खोळपे यांनी मनोगत व्यक्त केले. या व्याख्यानात प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. या संवादात अतुल मोरे,रोहन पवार,प्रवीण खोत तसेच अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे आभार नितीन बोरुडे ,लक्ष्मी भोसले,नेहा डांगे यांनी मानले. या कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ व शिबिरार्थी मोठ्या प्रमाणात हजर होते.