पिंपोडे बुद्रुक येथे आठवडाभर लॉकडाऊनचा निर्णय
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, ता.१४ : येथे निकट सहवासातून मायलेकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून येथील बाजारपेठ आठ दिवस संपूर्ण बंद ठेऊन लॉकडाऊन करण्याचा निर्णय ग्रामदक्षता समितीने घेतला आहे.
संबंधित महिला ४७ वर्षांची असून ती १५ वर्षांचा मुलगा व पतीसह एक जुलैला एकसळला (ता.कोरेगाव) आजारी असणाऱ्या नातेवाईकाला भेटण्यासाठी गेली होती. दोन दिवस मुक्काम करुन पुन्हा सर्वजण गावी आले. त्यानंतर काही दिवसांत मुलाला ताप येऊ लागल्यानंतर प्राथमिक उपचार सुध्दा घेण्यात आले. मात्र संबंधित महिलेला सुध्दा त्रास जाणवू लागला. हे सर्वजण पहायला गेलेल्या नातेवाईकाचा कोरोना रिपोर्ट आठ जुलैला पॉझिटिव्ह आला. त्यांचे निकट सहवासित म्हणून गुरुवारी या मायलेकांचे स्वॅब घेऊन तपासणीला पाठवण्यात आले. काल (रविवार) रात्री संबंधित महिला आणि मुलाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आणि ग्रामस्थांच्या काळजाचा ठेका चुकला. या कुटुंबाच्या सहवासात अनेकजण आल्याने गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे. एकाच घरातील दोन बाधित आढळल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. आपण बाधितांच्या सहवासात आलो तर नाही ना? अशी भीती ग्रामस्थांमध्ये आहे.१३ रोजी मुलगा आणि महिलेला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. घरातील निकटवर्तीय असणारे पती आणि सासरे यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांना कोरेगाव येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. प्रशासनाकडून या कुटुंबाच्या घरापासून २५० मीटरचा परिसर कंटेंटमेंट झोन जाहीर करून सील करण्यात आला आहे.
तब्बल महिनाभराने गावात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने तसेच खरेदीच्या नावाखाली विनाकारण गर्दी होत असल्याने आजपासून रविवारपर्यंत (ता.१९) संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय ग्राम दक्षता समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यातून जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील दवाखाने व मेडिकल सुरू राहणार आहेत.
सोमवारी (ता.२०) रोजी परिस्थिती पाहून लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात पुढील निर्णय होणार आहे. याबाबत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन तहसिलदार रोहिनी शिंदे यांनी केले आहे. यापूर्वी गावात मुंबईहून आलेले दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. ते पुर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर मागील तीन आठवड्यात तीन रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह होते. हे मायलेक कोणा कोणाच्या संपर्कात आले याची चौकशी आरोग्य विभागाकडून सुरू आहे. कोरोना ग्रामदक्षता समिती, महसूल, आरोग्य खाते यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नागरीकांनी स्वःताची काळजी घेण्यासाठी तोंडाला मास्क बांधणे, सुरक्षित अंतर ठेवणे व विनाकारण घराबाहेर पडु नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.