मोठ्या मेहनतीने रब्बी हंगाम साधला होता. काळी आई हिरवा शालू नेसून डोलत होती. बळीराज येणा-या धनातून म्होरली सपान बघत असतानाच अवकाळी अन् धुकं याने त्याच जीणं धाकधुकीच करुन सोडलं.
द्राक्षांचे फुटलेले मणी, मोहराने बहरलेली आमराई मोहर गळून जाण्याची भीती, निसवलेल्या ज्वारीत अंतरा, पोट-यातील गव्हावर तांबेरा, घाट्यातला हरभार आंब धुऊन, भाजीपाला सडला, पावटा, घेवडा, कोंथमिर, गाजरं, दोडका, भोपळा, वांगी, पावटा, वाटणा अवकाळीने व धुक्याने करपा, मावा, फुलकिड, भुरी, तुडतुडे या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
“निसर्गराजा एवढा कोपू नगस. अरे पावसाने झोडपले, राजाने लाथडले अन् नव-याने मारले तर तक्रार करायची कुणाकडं?”
माणसा तुला जगायचं कसं हेच कळना म्हणून मला असे वागावे लागते. जरा इचार कर. जंगल तोड, प्रदुषण, वाहनांचा अतिरेक, प्लास्टिकचा भरमसाठ वापर, प्राण्यांचा आधिवास संपुष्टात, नद्यांच्या बेसुमार वाळू उपसा, समुद्रात सर्व निचरा, डोंगर फोड, सिमेंट जंगले, पाणी आडवा मुरवा यापेक्षा भावकीची जिरवा. बेसुमार किटकनाशके व तणनाशके यांची फवारणी. सांग मानवा माझ्या जीवची नुसती काहिली होतीया. तू लक्ष्मण रेषा ओलांडून माझ्यात अतिक्रमण केल्यास मला ही अवकाळी व धुकं धाडाव लागतंय.
मानवा तरी मी तुला वेळोवेळी सावध करतो.पण तू पहिले पाढे पंचावन्न असाच वागतो.तू माझ्यात ढवळाढवळ करु नकोस.मी तुझ्या वाटेला जाणार नाही.