स्थैर्य, सातारा, दि. ०४ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी असल्याने पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मालखेड, ता. कराड येथे सातारा जिल्ह्यात येणारी वाहने तपासणीसाठी उभारण्यात आलेल्या चेकनाक्यांमध्ये कोल्हापूरकडून येणारा भरधाव ट्रक शिरल्याची घटना सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास घडली. या अपघातात ड्युटीवर असणारे पाच ते सहा कर्मचारी प्रसंगावधान राखून तेथून पळाल्याने बचावले तर ट्रकच्या खाली सापडलेले शिक्षक आत्माराम ज्ञानदेव मिसाळ हे सुदैवाने बचावले. या अपघातात मालखेड येथील या तपासणी नाक्यासाठी उभा केलेले शेड पूर्ण उध्वस्त झाले. अपघातावेळी ट्रकचा आवाज झाल्याने सांगली व कोल्हापूरकडे जाणारी वाहने तपासणार्या बाजूच्या तपासणी नाक्यावरील पोलिसांनी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना जिल्हाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून येणार्या व जाणार्या वाहनांच्या तपासणीसाठी मालखेड, ता. कराड येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर प्रशासनाच्यावतीने तपासणी नाका उभारला आहे. गेल्या चार महिन्यांपासून या चेकनाक्यावर ये-जा करणार्या वाहनांची कसून तपासणी केली जाते. त्यासाठी येथे कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी व वाहनांच्या नोंदी ठेवण्यासाठी शिक्षक ड्युटीवर असतात. त्याचबरोबर महसूल व आरोग्य कर्मचारीही येथे कार्यरत आहेत. विनापरवाना कोणतेही वाहन येथून सोडले जात नाही. पोलीस वाहन थांबवून कागदपत्रे व ई-पासही तपासत आहेत. सोमवारी नेहमीप्रमाणे तेथे नाक्यावर कसून तपासणी सुरू होती. पोलीस वाहन व शिक्षक वाहने तपासत असताना काही जण महामार्गाच्या कडेला उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये थांबले होते. सकाळी 9 च्या सुमारास अचानकपणे इचलकरंजीहून पुणे बाजूकडे निघालेला मालट्रक (क्र. एम.एच.09 सीए 9858) हा चालकाचा ताबा सुटल्याने पोलिसांनी उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये शिरला. तपासणी नाका आहे, याची कल्पना असतानाही भरधाव आलेला ट्रक थेट शेडमध्येच शिरला. त्यामुळे त्या कर्मचार्यांनी ओरडून शेडमध्ये बसलेल्या अन्य कर्मचार्यांना त्याची कल्पना दिली. ट्रक पाहून तेही नाका सोडून बाहेर पडले. त्यामुळे तेही बचावले. या अपघातात शिक्षक किरकोळ जखमी झाला तर पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले. या अपघातात नाक्यासाठी उभा केलेले शेड पूर्ण उध्वस्त झाले आहे. ट्रकचा आवाज झाल्याने सांगली व कोल्हापूरकडे जाणारी वाहने तपासणार्या बाजूच्या तपासणी नाक्यावरील पोलिसांनी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व तेथे मदतकार्य राबवले. सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालक नियाज अमीर शब्बीर पठाण (रा. पठाण गल्ली, कबनूर, ता. हातकणंगले) याला ताब्यात घेतले आहे. दारूच्या नशेत ट्रक चालवल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.