राज्यातील तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे पंधरा दिवसात भरणार – क्रीडा मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । मुंबई । राज्यातील क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे 15 दिवसाच्या आत भरली जातील अशी माहिती क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना क्रीडा मंत्री श्री महाजन बोलत होते.

क्रीडा मंत्री श्री. महाजन  म्हणाले , महाराष्ट्र शासनाने 2003 च्या शासन निर्णयाद्वारे तालुका क्रीडा संकुले उभारण्याचा धोरणत्मक निर्णय घेतला असून राज्यात 380 तालुका क्रीडा संकुले मंजूर आहेत. सद्य स्थितीत राज्यात 100 क्रीडा अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून यापैकी फक्त 20 टक्के पदे भरलेली आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन येत्या आठवड्यात नागरी सेवा मंडळाची तातडीने बैठक घेऊन 44 पदे भरली जाणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 15 पदांची मुलाखत प्रक्रिया या महिनाअखेर पूर्ण होईल. अशी 69 पदे उपलब्ध होणार असल्याचेही श्री महाजन यांनी सांगितले.

राज्यातील जुन्या आणि नवीन तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलांना देण्यात येणाऱ्या निधीच्या तरतुदीमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच दर्जेदार आणि चांगल्या प्रतीचे क्रीडा साहित्य खरेदी करण्यात येणार असल्याचेही श्री महाजन यांनी यावेळी सांगितले.

राज्यामध्ये क्रीडा धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘सी एस आर’ च्या माध्यमातून  क्रीडा प्रकारांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून घेण्याबाबतही विचार करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रश्नाच्या वेळी सदस्य सर्वश्री भाई जगताप, सचिन अहिर, राम शिंदे, संजय आजगावकर, सतीश चव्हाण, अनिकेत तटकरे, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!