दैनिक स्थैर्य । दि. २७ फेब्रुवारी २०२२ । फलटण । राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच औद्योगिक, आर्थिक, न्यायालयीन क्षेत्रातही मराठी भाषेचा वापर जाणीवपूर्वक वाढवला पाहिजे. याची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून वैयक्तिक जीवनात, व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. मराठी ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या दहा भाषांपैकी आहे. मराठीला हजारो वर्षांची समृद्ध, गौरवशाली परंपरा आहे. विविध संतांनी त्यांचे अलौकिक विचार मराठी भाषेत मांडले. महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी त्यांच्या साहित्यकृतींतून मराठी भाषा समृद्ध केली. ‘कुसुमाग्रज’ तथा कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना अभिवादन केले असून फलटण शहरासह तालुक्यातील नागरिकांना व मराठी भाषाप्रेमींना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या.
गावखेड्यातल्या बोलीभाषांनी मराठीचे सौंदर्य अधिक वाढवले. आज बारा कोटी लोक मराठी भाषा बोलतात. सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून मराठी देशात तिसऱ्या आणि जगात दहाव्या क्रमांकावर आहे. मराठी ‘ज्ञानभाषा’ झाली पाहिजे. मराठीची उपयोगिता वाढली पाहिजे. जागतिक स्तरावर संपर्क, संवाद, व्यवहाराची भाषा म्हणून मराठीला स्थान मिळाले पाहिजे. आगामी काळामध्ये लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे गरजेचे आहे, असेही युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.