रासायनिक निविष्ठांचा वापर हा शेवटचा पर्याय असावा- शास्त्रज्ञ डॉ. इंडी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । सोलापूर शेतीमध्ये पिकांवर येणाऱ्या विविध कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक निविष्ठांचा वापर हा शेवटचा पर्याय आहे असे प्रतिपादन विभागीय कृषि संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.  इंडी यांनी केले. किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठण्यापूर्वी जैविक, भौतिक व मशागतीय नियंत्रण पद्धतीचा अवलंब केल्यास किडींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही आणि वापरलेल्या रासायनिक निविष्ठाचा योग्य परिणाम साध्य होतो. त्यामुळे कीड-रोग व्यवस्थापनासाठी रासायनिक निविष्ठांचा वापर हा शेवटचा पर्याय आहे असे प्रतिपादन डॉ. इंडी यांनी केले.

मानवलोक अंबाजोगाई व थरमॅक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेती शाळेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की भाजीपाला पिके ही शक्यतो गादीवाफ्यावर घ्यावीत ज्यामुळे उत्पन्नात वाढ होते हे अनेकवेळा आढळले आहे.

विविध पिकामध्ये पक्षी थांबे करावेत, पिवळे-निळे चिकट सापळे लावावेत. पेरणी आधी बीज प्रक्रिया करून घ्यावी ही बीज प्रक्रिया पिकांसाठी लसीकरणाची भूमिका बजावते.

मानवलोक मार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पात उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी आणि हिरज या गावात अनुक्रमे ४ व ८ ऑगस्ट रोजी शेती शाळा घेण्यात आल्या.

या शेती शाळेसाठी पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक अतिश शिरगिरे, वांगी येथील जय जवान जय किसान सोयाबीन उत्पादक गट, बळीराजा सोयाबीन उत्पादक गट, हिरज येथील कांदा, टोमॅटो, सोयाबिन आणि उडीद उत्पादक गटातील शेतकरी तसेच मानवलोक अंबाजोगाईचे कार्यकर्ते उपस्थित होते.

देशात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या जवळपास ८५% आहे. त्यांची गुंतवणूक क्षमता, रिस्क घेण्याची क्षमता अत्यल्प असते. भूधारकता वाढवने शक्य नसले, तरी समान पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उत्पादन केल्यास अनेक अडचणींना सामोरे जाणे तुलनेने सोपे जाते.

या बाबींचा विचार करून मानवलोक व थरमॅक्स फाउंडेशन मार्फत सोलापूर जिल्ह्यातील “उत्तर सोलापूर तालुक्याच्या गावातील शेतकरी गटांना रेसिड्यू फ्री, शाश्वत शेती करण्यासाठी सहाय्य” हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विशेषतः फार्मर कप मध्ये सहभागी गटांना प्राधान्याने यात मदत करण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!