न बघितलेले सुंदर महाबळेश्वर


बरेच दिवस मला शैलेश करंदीकर ह्यांच्या बरोबर जायचे ठरवत होतो पण वेळेअभावी जमत नव्हते.16 फेब्रुवारी रोजी मी ठरवले की हा सुवर्ण योग सोडायचा नाही. मग काय ठरल्या प्रमाणे पहाटे 6.45 वाजता राजवाडा येथून 23 जणांची टीम सोबत प्रवास सुरू झाला. सुरवातीला बोगद्या सोडून गाडी यवतेश्वर कडे निघाली त्यावेळेस शैलेशजीनी यवतेश्वर तसेच पेढ्याचा भैरोबा कसे नाव पडले ह्या बद्दल माहिती सांगितली. तसेच पूर्वीचा जुना राजमार्ग म्हणुन ओळख असलेला कास महाबळेश्वर राजमार्गाने ऐकीव गावातून ही वाट जाते. जाताना प्रथम मोलेश्वर हे महादेवाचे अतिशय सुंदर मंदिर पाहिले तसेच गाळदेव चे मंदिर हे गर्द झाडीत वसलेले एक सुंदर महादेव मंदिर आहे. ह्या मंदिराना शिवपुर्‍या असे म्हणतात.

 

जावळीचे चंद्रराव मोरे ह्यांच्या काळात वसलेल्या ह्या शिवपुर्‍या आहेत. शिवपुरी म्हणजेच शंकराचे मंदिर. तेथून पुढे गेल्यावर आम्ही भावेश भाटिया ह्यांच्या मेणा पासून विविध प्रकारच्या वस्तू बनवण्याचा उद्योगास भेट दिली. ते स्वतः अंध असून त्यांनी बर्‍याच अंध व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली आहे. त्यांची बोलण्याची पद्धत पाहून व त्यांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या मेणबत्या व पुतळे पाहून मनातील नकारात्मकता नाहीशी होते. आवर्जून सर्वांनी एकदातरी ह्या उद्योगास भेट द्यावी.
क्षेत्र महाबळेश्वर चे पंचगंगा मंदिर सर्वांना माहीत आहे परंतु माहिती नसलेले असे दगडी कृष्णा माई मंदिर तेथून साधारण पाच मिनिटाच्या अंतरावर आहे. येथून कृष्णा नदी उगम पावून प्रवाहित होते. मंदिराचे दर्शन घेतल्यावर आम्ही शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला व पुढील प्रवासासाठी निघालो. मधाचे गाव मांघर साधारणतः महाबळेश्वर मार्केट पासून 8 किलोमीटर असून त्याच्या अलीकडे रस्त्याचा डावीकडे मालुसरे गाव लागते तेथून व तापोळा रस्त्याच्या वाटेने मालुसरे गावाच्या फाट्याच्या अलीकडे डाव्या बाजूला एक पाऊल वाट जंगलात जाते साधारणतः 15ते 20 मिनिटे घनदाट जंगलातून प्रवास केल्यानंतर उघड्या माळावर येऊन पोचतो. माळावर असंख्य दगड धोंडे असल्याने त्यास धोंडे माळ असे नाव पडले असावे. तेथून पुढे गेल्यावर भारतातील सर्वात जास्त संख्येने वटवाघळांचे राहण्याचे ठिकाण असलेली व न पाहिलेली अशी शिन शिन गुहा किंवा रॉबर्ट केव्ह .

 

साधारणपणे ह्या गुहेमध्ये 25000 ते 30000 वट वाघळे गुहेमध्ये राहतात. ह्या गुहेचे वैशिष्ट म्हणजे 20 ते 25 फूट शिडी वरून खाली उतरून जावे लागते. खाली उतरून आल्यावर वटवाघळांचा आवाज व एक प्रकारचा उग्र वास येतो. हा परिसर जंगलाचा निर्जन असल्याने ग्रुपने येणे सोईस्कर व सुरक्षित. पाण्याची सोय येथे नाही. एकूण प्रवासाबद्दल सांगायचे झाल्यास शैलेश करंदीकर ह्यांच्या बरोबर आवर्जून सर्वांनी एकदातरी कुठल्या ना कुठल्या तरी सहलीस जावे कारण सर्व जणांची काळजी व सुंदर असे नियोजन स्वतः शैलेश करतात…. लिहिण्यासारखे भरपूर आहे परंतु तूर्तास इतकेच बाकीचे पुढील भागात…..


Back to top button
Don`t copy text!