स्थैर्य, फलटण : ‘सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे’ असे मानवी जीवन असून आनंद आणि दुःख ह्या मानवी भावना आहेत. आयुष्यात आनंदाच्या घटना घडतात तशाच दुःखाच्याही घटना घडत असतात, तथापी आनंदात आणि दुःखात भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असल्याचे एका कृतीशील कुटुंबाने दाखवून दिले आहे. सहसा एकसारख्या कृतीमधूनच आनंद आणि दुःख व्यक्त करता येत नाही. आनंद झाल्यावर माणुस गोडधोड वाटतो, फटाके फोडतो, घरात उत्सव साजरा करतो परंतू दुःखद घटना घडल्यानंतर असे काही करता येत नाही, मात्र आनंदी आणि दुःखी या दोन्ही प्रसंगांना एकाच पद्धतीने साजरे करण्याची अनोखी प्रथा कांबळेश्वर गावाने वृक्षारोपण संकल्पनेद्वारे यशस्वी केली आहे.
बारवनगर, कांबळेश्वर, ता. बारामती येथील पोपट गणपतराव पवार व बापू पवार यांच्या मातोश्री सरुबाई गणपतराव पवार यांच्या सावडण्याच्या विधीला आंब्याची २ झाडे लावुन त्या मातीत रक्षाविसर्जन करण्यात आले. आपल्या आईच्या दुःखद आठवणीत झाडे लावुन त्याची जोपासना करण्याची गावची परंपराच बनली आहे.
दुसरा प्रसंग त्याच दिवशीचा आहे पण आनंदाचा आहे. गावचे युवा सहकारी किरण खोपडे यांना पुत्ररत्न प्राप्त झाले त्या आनंदोत्सवासाठी त्यांनी ग्रामविकास समितीकडे २१ रोपे वृक्षारोपणासाठी दिली. आपल्या मुलाच्या जबाबदारीबरोबर या २१ झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांनी उचलली आहे.
आनंद आणि दुःखात असे उपक्रम लोकचळवळीचे स्वरुप घेत असतात. आज गावामध्ये हजारो झाडे लोकसहभागामधून उभी राहिली आहेत, ही चळवळ येणार्या पिढीसाठी आदर्श ठरणार आहे. समाजहिताची एक परंपरा “वृक्षारोपण व संवर्धनाच्या” माध्यमातुन बहरत आहे, याच पद्धतीने महाराष्ट्रभर वृक्षा रोपणाची चळवळ रुजली तर आगामी पर्यावरण संतुलन विषय संपून पुन्हा एकदा केवळ हरित नव्हे सुजलाम सुफलाम भारत उभा करता येईल असा विश्वास युवक मित्र ह.भ.प. बंडा महाराज कऱ्हाडकर यांनी व्यक्त केला आहे.