सहकारी संस्थांचा बिगुल वाजला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.३:  कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आतापर्यंत चारवेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तथापि, राज्यातील चांगलया रितीने विधान परिषदांच्या निवडणुका व ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून तसेच सहकारी संस्थांमधील लोकप्रतिनिधींकडून करण्यात येणारी विनंती याचा विचार करून सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरू करावी, अशा आदेय राज्य शासनाच्या सहकार खात्याने काढला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा बँक, कृष्णा कारखाना सह अनेक सहकारी संस्थांचा बिगुल या निमित्ताने वाजणार आहे.जागतिक महामारी कोवीड 19ने देशासह महाराष्ट्रात थैमान घातल्यामुळे लॉकाडाऊन करण्यात आले होते. निवडणुकाही स्थगित करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने सहकारी संस्थांच्या निवडणुकाही लांबणीवर पडल्या होत्या. राज्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती विचारात घेता विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका दि. 18 मार्च 2020 रोजीच्या आदेशान्वये 17 जून 2020 पर्यंत पुढे ढकलल्या होत्या. तथापि, कोरोनाचे सावट कायम राहिल्याने दि. 17 जून पुन्हा आदेश काढून निवडणुका दि.16 सप्टेंबर 2020 पर्यंत तसेच दि.28 सप्टेंबर 20 ला आदेश काढून दि. 31 डिसेंबर, 2020 पर्यत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यानंतर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याबाबत मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्यावर असतील त्या टप्यावर दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

दरम्यान, डिसेंबरमध्ये राज्यातील विधान परिषदांच्या निवडणुका तसेच नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडल्या. त्याचप्रमाणे राज्यातील लोकप्रतिनिधी व सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याची विनंती सहकार विभागाकडे केली आहे. याचा विचार करून राज्य शासनाने दि.16 जानेवारी 2021 रोजीचे आदेश रद्द करुन ज्या टप्प्यावर सहकारी संस्थांच्या निवडणूका स्थगित करण्यात आलेल्या होत्या त्या टप्प्यापासून कोव्हीड- 19 च्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्यावाबतची कार्यवाही तात्काळ सुरु करण्यात यावी, असे परिपत्रक काढले आहे. यावेळी रखडलेल्या अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.


Back to top button
Don`t copy text!