स्थैर्य, सातारा, दि.९: सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख तसेच शिवसेनेचे पदाधिकारी यांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगाधावने हा अनुसूचित प्रकार टळला आणि अनेकांचे जीव वाचले. याबाबत घटनास्थळवरून व पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, आज सकाळी दहिवडीकडून वडूजच्या दिशेने एक भरधाव वेगाने एक कंटेनर एम एच १२ पी क्यू १४५१ येत होता. या चालकाने दहिवडी येथून येत असताना अनेक वाहनांना घासून कंटेनर पुढे नेला. एका तलाठ्याच्या गाडीच्या जवळूनही कंटेनर पुढे नेला.
दरम्यान वडूज शहरात हे वाहन येत असताना या वाहनाचा वेग ८० ते ९० च्या आसपास होता. शहरात आल्यानंतरसुद्धा त्या वाहन चालकाने आपल्या गाडीचा वेग हा तसाच ठेवत शहरातून प्रत्येक गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून शहरातील काही लोकांनी याबाबत वडूजचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना माहिती दिली.
यावेळी संतोष काळे हे वडूज येथील कराडच्या मुख्य रस्त्यावर ड्युटीला होते. त्यांना तो ट्रक वेगाने येताना दिसला. त्यांनी त्या ट्रक चालकास वाहन थांबवण्याचा इशारा केला. मात्र त्या ट्रक चालकाने ते वाहन तसेच पुढे नेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी संबंधित कंटेनरचा पाठलाग करणारे शिवसेना विभागप्रमुख आबासाहेब भोसले यांनी चालत्या कंटेनरच्या केबिनमध्ये जाऊन वाहनाचा ताबा घेऊन प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान दाखवून वाहतूक कर्मचारी संतोष काळे यांनी त्या वाहनाला रस्त्यावर आडवे जाऊन थांबवण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर कंटेनर हा पोलिस ठाण्यात आणून पुढील कारवाई करण्यात आली.
अखेर पोलिस आणि काही नागरिकांनी त्या वाहनाचा पाठलाग करत त्या वाहनाला थांबवले आणि पोलिस ठाण्यात आणले. त्या वाहनचालकने दारू पिल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांनी त्या चालकास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेबाबत कार्यतत्परता दाखवत नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या पोलिस वाहतूक कर्मचारी संतोष काळे तसेच आबासाहेब भोसले यांचे नागरिकांनी अभिनंदन केले.