
दैनिक स्थैर्य | दि. ०२ नोव्हेंबर २०२१ | खंडाळा | पारगाव ता.खंडाळा गावच्या हद्दीत पोलीस असल्याची बतावणी करत मालट्रकचालकाला दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी 35 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे.
याबाबतची खंडाळा पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, केतकावळे जि.पुणे येथून तमिळनाडू याठिकाणी भूसा घेऊन निघालेला मालट्रक (क्रं.एपी-05-टीटी-0257) हा चालक राजा एस.सामिनाथन (वय 52,रा.गंगासमुद्रम पर्धाराम ता.गुडीयाधम जि.वेल्लूर राज्य तमिळनाडू) हा सोमवार दि.31ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.30 वा.केसुर्डी फाटा ओलांडून पारगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीत आला असता पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन अज्ञातांनी मालट्रकचालक राजा सामिनाथन याला हम पोलीसवाले है, गाडी साईड मे लो असे म्हणाले. यावेळी संबंधितांनी राजमुद्रा असलेले ओळखपञ दाखवित मालट्रकचालकाला तुमने दारु पिया है, तुम्हारी गाडी में दारु है, गाडी चेक करनी है असे म्हणत गाडी चेक करण्याच्या बहाण्याने हातचलाखीने गाडीमध्ये ठेवलेले 35 हजार रुपये रोख रक्कम लंपास करीत घटनास्थळावरुन पोबारा केला. यावेळी मालट्रकचालक राजा सामिनाथन याने खंडाळा पोलीस स्टेशनला धाव घेत फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे हे तपास करीत आहे.