
दैनिक स्थैर्य । 24 मार्च 2025। सातारा | येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरील हनुमान मंदीर परिसरातील वृक्षसंपदा रविवारी दुपारी 12 वाजता कोणीतरी अज्ञाताने लावलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. किल्ल्यावर धुराचे मोठ्या प्रमाणात लोट सुरु होते.
ही माहिती सातारा नगर पालिका अग्निशमन दलास मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी जावून ही आग आटोक्यात आणली.
किल्ले अजिंक्यतारा परिसर आणि डोंगर उतार गर्द वनराईने समृध्द आहे. या वनराईत सागाची झाडेही मोठ्या प्रमाणावर आहेत. येथे मोरांचे वास्तव्यही बर्यापैकी आहे. ससे, घारींची घरटी, काळ्या चिमण्याही मोठ्या प्रमाणात आहेत.
अज्ञाताने लावलेल्या या आगीनंतर काही वेळातच धुरांचे मोठ्या प्रमाणात लोट सुरु झाले. ही घटना सातार्यातील श्रीनिवास कुलकर्णी यांच्या दुपारी 1 वाजता निदर्शनास येताच त्यांनी ही बाब तात्काळ नगर पालिकेच्या अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर अग्निशमन अधिकारी सुनील निकम, फायरमन सुनील पारधे हे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले.
त्यावेळी आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे या डोंगर उतारावरील वनराईमधून ससे, काळ्या चिमण्या या जीवाच्या आकांताने सैरभर धावू लागले होते. अनेक वन्यजीवही या आगीत होरपळे आहेत.
दरम्यान, आगीवर नियंत्रण आणताना काहींनी झाडाच्या पानांचा खराटा करुन आग नियंत्रणात आणण्यात मदत केली.