कासच्या सौंदर्याचा खजिना खुलू लागला

पठारावर चवर फुलांचा सडा ; वीकेंडला होतेय पर्यटकांची गर्दी


कास – कास पठाराच्या सौंदर्याची नजाकत विलोभनीय दिसत असून, सध्या चवर जातीच्या फुलांचा सडा पडला आहे. (छाया : अतुल देशपांडे, सातारा)

दैनिक स्थैर्य । 5 ऑगस्ट 2025 । सातारा । निसर्गाच्या सौंदर्य आविष्काराचे जिवंत उदाहरण म्हणजे कास पठार. जागतिक वारसास्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेले हे पठार आता विविध रंगीबेरंगी रान फुलांनी बहरू लागले आहे. सातारा शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असणार्‍या कास पठारावर सध्या चवर जातीच्या फुलांचा सड़ा पडला आहे. चवर फुलांनी पठार पांढरे शुभ्र दिसत आहे; तर धनगरी फेटा, आमरी, कंदील पुष्प, गेंद ही फुले उमलायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कास पठारावरील विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची वीकेंडला मोठी गर्दी होत आहे.
मे महिन्यापासून काससह संपूर्ण पश्चिम भागामध्ये कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हिरवळ तयार झाली असून, फुले उमलण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. दरवर्षी कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम हा 1 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात येतो. मात्र, यावर्षी मे महिन्यापासूनच चांगला पाऊस झाल्याने कास पुष्प पठारावर फुले उमलायला सुरुवात झाली आहे. सध्या संपूर्ण पठारावर चवर फुलांचा बहर आला असून, संपूर्ण पठार पांढरे शुभ्र दिसत आहे. त्यातच चवरच्या जोडीला धनगर फेटा, आमरी, कंदील पुष्प, गेंद यासह छोटी-मोठी फुले उमलायला सुरवात झाली आहे.

यावर्षी तेरडा हे फूल देखील लवकर उमलायला सुरुवात होणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कास पुष्प पठारावरील फुलांनी लवकर फुलायला सुरुवात केल्याने हंगाम देखील यावर्षी 15 ऑगस्टदरम्यान सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. कास हंगाम सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार असून, उद्योग व्यवसायात देखील खूप मोठ्या प्रमाणावर उलाढाल होणार आहे. धनगरी फेट्याप्रमाणे गवताच्या दांड्यावर टोपीसारखा भाग असणारे गेंद ही फुलवनस्पती आहे. यामध्ये तीन जाती आहेत. सीतेची आसवे, धनगरगवत, तेरडा याचे एकत्रित फुललेले दृश्य पर्यटकांसाठी पर्वणी असते. ही फुले उमलू लागली आहेत. जमिनीमध्ये हळद किंवा आले सारखे लांबट आकाराचे कंद दिसून येतात. याच कंदातून पठारावर पांढर्‍या रंगांची फुले उमलतात. यास चवर किंवा चवेटा असे म्हणतात. यामध्ये दोन जाती आहेत. पांढर्‍या रंगाची चवर व तांबड्या रंगाची चवर अशा जाती आहेत. पाने करदळीच्या पानांसारखे लांबट असणारी ही फुले आता बहरू लागली आहेत. यावर्षी कासचा हंगाम दरवर्षापेक्षा अधिक काळ टिकून राहण्यास मदत होणार आहे.

येत्या काही दिवसांत कासचा हंगाम सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. यावर्षी मे महिन्यापासून परत असणार्‍या पावसामुळे पठारावरील फुले उमलायलाही लवकर सुरुवात झाली आहे. सध्या चवर व इतर फुले पठारावर फुलायला सुरुवात झाली. त्यामुळे कास पठार कार्यकारी समिती सर्व सदस्य व वन विभागाचे संबंधित अधिकारी यांच्यामध्ये एकत्रित चर्चा होऊन हंगामाबाबत निर्णय घेण्यात येईल.

ज्ञानेश्वर आखाडे, कास पठार कार्यकारी समिती सदस्य

 


Back to top button
Don`t copy text!