रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरीबाबत परिवहन आयुक्तांनी घेतला आढावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑकटोबर २०२२ । चंद्रपूर । उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीत मुख्यत्वे परिवहन विभागातील दैनंदिन प्रशासकीय कामकाज व रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरी या दोन बाबींवर प्रकाश टाकण्यात आला.

बैठकीला नागपूर(शहर/ग्रामीण)प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयसिंह चव्हाण, भंडाऱ्याचे राजेंद्र वर्मा, चंद्रपूरचे किरण मोरे, गोंदियाचे राजवर्धन करपे, वर्धाचे समीर शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यात परिवहन विभागातील प्रशासकीय कामकाज गतिमान, सुलभ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने बहुतांश सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. सदर ऑनलाईन सेवांबाबत सेवेचे लाभार्थी म्हणजेच अर्जदार यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद साध्य होतो की नाही यांची प्रत्यक्ष परिणामकारकता तपासण्याविषयी निर्देश, त्यासोबतच सेवा हमी कायद्याअंतर्गत 14 सेवांचा आढावा घेऊन कोणतेही अर्ज प्रलंबित राहणार नाही याविषयीच्या सूचना परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिल्या.

परिवहन आयुक्त श्री. भिमनवार यांनी मोटार वाहन कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी म्हणजे दंड वसुली व संख्यात्मक वाढ हे नसून अपघाताचे प्रमाण कमी करणे व रस्त्यावरील सुरक्षेबाबत गुणात्मक बदल घडवून आणणे याविषयी मार्गदर्शन केले. थोडक्यात विभागाच्या कामकाजाविषयी सर्वसामान्य जनतेला सकारात्मक वाटण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी असे निर्देश दिले.

चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात भेटीदरम्यान परिवहन आयुक्त श्री. भिमनवार यांनी गडचिरोली  उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी अद्ययावत यंत्रणासह सुसज्ज अशा तपासणी वाहनाचे निरीक्षण केले. सदर वाहन विशेष केंद्रीय सहाय्य योजनेच्या माध्यमातून उपलब्ध केल्याबद्दल गडचिरोली चे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयसिंह चव्हाण यांचे कौतुक केले.


Back to top button
Don`t copy text!