अनुवादकाने लेखकाची शैली आत्मसात करावी

ज्येष्ठ लेखिका अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी यांचे मत


सातारा – डॉ. उमा कुलकर्णी यांना मानपत्र प्रदान करताना विनोद कुलकर्णी. त्यावेळी डॉ. संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, नंदकुमार सावंत.

स्थैर्य, सातारा, दि.16 ऑक्टोबर : साहित्य क्षेत्रामध्ये भाषांतर, रूपांतर आणि अनुवाद हे तीन संपूर्णपणे वेगळे विषय आहेत. अनुवाद करत असताना अनुवादकाने मुळ लेखकाची शैली आणि विचार वाचकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे, असे मत जेष्ठ लेखिका व अनुवादक डॉक्टर उमा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा, आम्ही पुस्तक प्रेमी ग्रुप, मावळा फौंडेशन आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे डॉ. उमा कुलकर्णी यांचा अमृत महोत्सवी सत्कार व प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.

डॉ. उमा कुलकर्णी यांनी कन्नड साहित्यातील भैरप्पा, शिवराम कारथ, अनंतमूर्ती अशा अनेक ज्येष्ठ लेखकांच्या साहित्यकृती मराठीमध्ये अनुवादित केल्या आहेत. डॉ. संदीप श्रोत्री व विनोद कुलकर्णी यांनी यावेळी डॉ. उमा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला.

डॉ. उमा कुलकर्णी म्हणाल्या, अनुवाद ही एक विचारपूर्वक करण्याची गोष्ट आहे. मूळ लेखकांनी आपल्या साहित्यकृतीमध्ये जी संस्कृती दाखवली आहे. ती तशीच्या तशी अनुवादित साहित्यामध्ये आणली तरच तो विषय वाचकांपर्यंत पोहोचतो. मला कन्नड भाषेतील पुस्तके वाचता येत नसतानाही केवळ पती विरूपाक्ष कुलकर्णी यांच्या सहकार्यामुळेच अनेक ज्येष्ठ लेखकांच्या कन्नड साहित्य कृती मी मराठीत आणू शकले, असे त्यांनी सांगितले.

डॉ. उमा कुलकर्णी यांनी भैरप्पा, शिवराम कारंथ, डॉ. सुधा मूर्ती यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ लेखकांबरोबर कशाप्रकारे काम केले याच्या आठवणी सांगितल्या. सध्याच्या आधुनिक काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जरी अनुवाद केले जात असले, तरी त्यामध्ये लेखकाचा आत्मा आणणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान अनुवादाला आव्हान देऊ शकते असे वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले

मान्यवरांच्या हस्ते  डॉ. उमा कुलकर्णी यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी मानपत्राचे वाचन केले.

कार्यक्रमास श्रीकांत वारुंजीकर, डॉ. श्याम बडवे, पद्माकर पाठकजी, अभयसिंग शिंदे, वैभव ढमाळ, राजकुमार निकम, शुभदा कुलकर्णी, अदिती काळमेख, अनिल जठार, काका पाटील, गौतम भोसले, स्वाती राऊत, डॉ. राजेंद्र माने, प्रकाश शिंदे, सविता शिंदे, राजश्री शहा, वैदेही कुलकर्णी, रागिणी जोशी, प्रतिभा वाडीकर, गौरी वैद्य, अजित साळुंखे, श्रीमती काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार सावंत यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. सीमंतिनी नुलकर यांनी आभार मानले.

 


Back to top button
Don`t copy text!