मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना कालावधी वाढवून मिळावा

ग्रामपंचायत आस्थापनेत काम करणार्‍या प्रशिक्षणार्थी युवकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ जानेवारी २०२५ | फलटण |
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (ग्रामपंचायत आस्थापना) योजनेत काम करणार्‍या फलटण तालुक्यातील सर्व प्रशिक्षणार्थी युवक-युवतींनी आपल्या मागण्या पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. हे निवेदन प्रशासनामार्फत फलटणचे तहसीलदार यांनी स्वीकारले.

या निवेदनात प्रशिक्षणार्थी युवकांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य पातळीवर कार्यरत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आमची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेली आहे व नेमणूक झालेल्या कार्यालयात आम्ही प्रशिक्षण घेत आहोत. या योजनेच्या माध्यमातून आम्हा प्रशिक्षणार्थीना शासनाची कार्यप्रणाली जवळून समजून घेण्याची संधी मिळते आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे आम्ही आभार मानतो.

या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व प्रशिक्षणार्थींना कालावधी वाढवून मिळावा यासाठी प्रशिक्षणार्थीच्या संदर्भात शासनाने तसा निर्णय घेण्यासंबंधित आस्थापना यांना आदेशित करून पुढील प्रक्रिया सुरू करावी. जेणेकरून प्रशिक्षण कालावधीला जोडून नोकरी किंवा रोजगार देण्याच्या दृष्टीने व्यवस्था होईल.

प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींना कायमस्वरूपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून द्यावे, अशी महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थी युवक आणि युवर्तीची मागणी आहे.

याव्यतिरीक्त आमच्या खालील मागण्या आहेत.

१) या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व प्रशिक्षणार्थीना कालावधी वाढवून मिळावा.
२) वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परिक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थीना १०% राखिव (आरक्षित) जागा ठेवण्यात याव्यात.
३) प्रशिक्षण कालावधीनंतर शैक्षणिक अर्हतेनुसार मानधनात वाढ व्हावी.
४) शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा व वैद्यकिय रजा आहेत त्या आम्हालाही देय असाव्यात.

या योजनेचा हेतू यशस्वीपणे पूर्ण करून आमच्या भविष्याची दिशा निश्चित करावी तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने आमच्या वरील सर्व मागण्या आपल्या माध्यमातून मंजूर करून प्रशिक्षणार्थीना न्याय मिळवून देण्यास सहकार्य करावे व महाराष्ट्राला अधिक विकसित आणि गतिशिल बनविण्यासाठी आम्हाला योगदान देण्याची संधी द्यावी, अशी मागणी सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांनी निवेदनात केली आहे.


Back to top button
Don`t copy text!