समाजातील प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाण्याची राज्याची परंपरा अबाधित – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० सप्टेंबर २०२१ । मुंबई । राज्यातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याला आजवर लाभलेल्या प्रत्येक नेतृत्वाने प्रयत्न केले आहेत. ही परंपरा महाराष्ट्रात यापुढेही अबाधित राहील, जपली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांच्या मुलुंड येथील कुणबी विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीसाठी 5 कोटी रुपयांच्या धनादेश वाटपाचा कार्यक्रम झाला.

उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार म्हणाले, कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी शासन कटाक्षाने घेते. या वसतिगृह इमारत बांधणी प्रक्रियेत सौर ऊर्जेचा वापर व्हावा, अनावश्यक खर्च टाळावे, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पर्यावरणपूरक इमारत बांधण्यात यावी. इमारत बांधणीसाठी काही अडचणी आल्यास त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.

खासदार श्री.सुनील तटकरे म्हणाले, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार धनादेश वाटपाचा कार्यक्रम होत आहे. कुणबी समाजासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या वसतिगृहात राहून समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थी विविध क्षेत्रात नक्कीच प्राविण्य मिळवतील असा विश्वासही खासदार श्री. तटकरे यांनी व्यक्त केला.

कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना नोकरीत प्रवेशासाठी मुलाखत, स्पर्धा परीक्षेची तयारी, वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात वाटचाल करण्यासाठी हे वसतिगृह उपयुक्त ठरेल, अशा विद्यार्थी वसतिगृहाची स्थापना कुणबी समाजोन्नती संघ व राज्य शासनाच्या मदत निधीतून होत आहे. याबाबत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी श्री.बाबाजी जाधव, कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे, संदिप रायपूरे व संघाचे पदाधिकारी व सभासद कार्यक्रमास उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!