स्थैर्य, मुंबई, दि. २८: मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक तथा शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भावसंगीतकार पंडित नाथराव नेरळकर यांच्या निधनाने मराठवाड्यामधील संगीत क्षेत्राचा सूर अबोल झाला, या शब्दात ज्येष्ठ गायक पंडित नाथराव नेरळकर यांना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मंत्री श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात, अनेक शिष्य घडविणारे संगीत गुरू अशी पंडित नाथराव नेरळकर यांची ओळख होती. नाथराव नेरळकरांना ‘श्रेष्ठ गायक-अभिनेता’ पुरस्कार , ‘कलादान’ पुरस्कार , ‘उत्कृष्टता’ पुरस्कार , ‘औरंगाबाद भूषण’, ‘चतुरंग’ प्रतिष्ठानचा पुरस्कार तसेच २०१४ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कार/ सन्मानांनी गौरविण्यात आले होते. संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळवणारे नाथराव हे मराठवाड्यातील पहिलेच कलावंत होत. नाथरावांच्या निधनामुळे मराठवाड्यातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. नाथराव नेरळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !