
दैनिक स्थैर्य । दि.३१ जानेवारी २०२२ । सातारा । एक तीन वर्षाची मुलगी पाण्याच्या टाकीत बुडत असताना दुसऱ्या पाच वर्षाच्या मुलीने तिला धरून ठेवले आणि तिचे प्राण वाचवले. पाच वर्षाच्या ईश्वरी शेडगे या चिमुकलीची समयसूचकता अलौकिक आणि थक्क करून टाकणारी आहे, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
निझरे ता.जावली येथील तीन वर्षांची मुलगी कु.मनस्वी जोतिराम सापते ही घराजवळ खेळत असताना घराच्या बांधकामासाठी ठेवलेल्या पाण्याच्या टाकीत पडली.मनस्वी घाबरून ओरडू लागली. याचवेळी तिथेच खेळत असणारी पाच वर्षाची मुलगी कु. ईश्वरी विनोद शेडगे हिने प्रसंगावधान राखून मनस्वीचा हात धरून तिला पाण्यातून बाहेर ओढून धरले. इतर मुलांनी आरडाओरडा केल्यामुळे बांधकाम करणाऱ्या कामगारांनी टाकीकडे धाव घेत मनस्वीला टाकीतून बाहेर काढले आणि तिचे प्राण वाचले.
चिमुकल्या मनस्वीचे प्राण वाचवून आगळेवेगळे साहस करणाऱ्या ईश्वरीचा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी निझरे येथे सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना रांजणे, बाळासाहेब लोहार, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रमेश काळे, सरपंच सतीश भिलारे, उपसरपंच शकुंतला भिलारे, निझरे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. रेखा शेडगे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. एवढ्या लहान वयात प्रसंगावधान राखून धाडसी ईश्वरीने मनस्वीचे प्राण वाचवले. ईश्वरीचे हे कार्य कौतुकास्पद तर आहेच पण सर्वांना चकित करून टाकणारे आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.