
स्थैर्य, अमरावती, दि.०६: सर्वांच्या प्रयत्नातून व सहकार्यातून बाधितांची संख्या कमी होत आहे. ती आणखी कमी झाली की इतरही निर्बंध काढण्यात येतील. दक्षता पाळली तर पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. बाजारपेठा पूर्ण वेळ सुरू होऊन जनजीवन पूर्वपदावर यावे असाच शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे यापुढेही साथ नियंत्रणासाठी व्यापारी बांधवांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याच्या महिला व बालविकासमंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
चेंबर ऑफ अमरावती महापालिका मर्चंटस अँड इंडस्ट्रीजतर्फे महापालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात व्यापारी व कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण शिबिराचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, डॉ. विशाल काळे, हरिभाऊ मोहोड, संघटनेचे अध्यक्ष सुरेश जैन, सचिव घनश्याम राठी, प्रकाश बोके आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मर्चंटस चेंबर ऑफ अमरावती या संस्थेचे साथ नियंत्रणासाठी सुरुवातीपासून मोलाचे सहकार्य मिळाले आहे.
अमरावतीत साथ कमी होत आहे. त्यामुळे संचारबंदीत काहीशी शिथिलता आणली. यापुढेही असेच सहकार्य ठेवावे जेणेकरून इतरही निर्बंध काढून जनजीवन सुरळीत होईल. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लसीकरण कार्यक्रमालाही गती देण्यात येत आहे.
आयुक्त श्री. रोडे म्हणाले की, सर्वांच्या प्रयत्नांतुन अमरावती शहरात बाधितांचे प्रमाण कमी झाले. तिसरी लाट रोखण्यासाठी अधिकाधिक लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे विविध वर्गासाठी शिबिरे घेऊन लसीकरणाला वेग दिला जात आहे.
श्री. जैन म्हणाले की, अनेक ग्राहकांशी सतत संपर्कामुळे व्यापाऱ्यांना संसर्गाची जास्त जोखीम असते. हे लक्षात घेऊन शिबीर घेण्यात आले. आवश्यकता भासल्यास आणखी शिबीर घेण्यात येईल. सर्व व्यापारी बांधवांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
संचारबंदीचे काही निर्बंध काढून व्यापाराला चालना दिल्याबद्दल संघटनेतर्फे पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाचे आभार मानण्यात आले.