दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । सातारा । मद्यप्राशन केलेल्या चालकाने बेजबाबदारपणे चारचाकी वाहन चालवत चौघांना ठोकरल्याची थरारक घटना राजपथावर दत्त मंदिर ते रेमंड शॉप दरम्यान घडली . संतप्त नागरिकांनी या कारचालकाला बाहेर खेचून बेदम चोप दिला . या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाले असून काही वाहनांचे नुकसान झाले आहे .
सोमवारी रात्री 9 च्या सुमारास सातार्यातील शाहू चौक ते रेमंड शॉपी (तालीम संघ) या मार्गावर मद्यधुंद कारचालकाने बेफाम गाडी चालवली. भरधाव वेगातील या कारने प्रथम दत्त मंदिराजवळ एका दुचाकीस्वाराला ठोकरले. त्यामध्ये हा दुचाकीस्वार सुमारे पंचवीस फुट फरफटत गेला. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यानंतर कार चालकाने वेगातच पुढे जावून दोन चारचाकी वाहनांना व एका पादचार्यालाही ठोकरले. त्यामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी मद्यधुंद कार चालकाचा पाठलाग केला
त्यानंतर एका चारचाकी गाडीला ठोकरल्यानंतर ही कार रस्त्यालगतच्या झाडावर जावून धडकली. संतप्त जमावाने या चालकाला बाहेर खेचून बेदम चोप दिला. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यावेळी तोबा गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांनी संबंधित कार चालकाला ताब्यात घेवून जमावाला शांत केले. त्यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.