भाजपमधील ‘साडेतीन’ लोकं लवकरच अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील; संजय राऊत यांचा सूचक इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१४ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । शिवसेनेचा हा मंत्री जेलमध्ये जाणार, तो मंत्री जेलमध्ये जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांच्या बाजूच्या कोठड्या सॅनिटाईज करुन ठेवाव्यात, असे भाजपचे नेते म्हणत आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत भाजपमधीलच ‘साडेतीन’ लोकं हे अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि देशमुख  हे बाहेर असतील, असे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. आतापर्यंत आम्ही खूप सहन केलं, आता आम्ही आरोप करणाऱ्यांना उद्ध्वस्त करु. राज्यात आमचं सरकार आहे आणि त्याचं नेतृत्त्व शिवसेनेकडे आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावं, असेही संजय राऊत यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात दुपारी चार वाजता आपण पत्रकारपरिषद घेऊ, असे सांगितले. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं उर्जाकेंद्र आहे. उद्याच्या पत्रकारपरिषदेला शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि खासदार हजर असतील. त्यावेळी आम्ही काय बोलू, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले असेल. या पत्रकारपरिषदेत आमच्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांना आम्ही प्रत्युत्तर देऊ. भाजपचे नेते हा नेता जेलमध्ये जाईल, तो नेता अनिल देशमुख यांच्या बाजूच्या कोठडीत असेल, असे म्हणत आहेत. पण पुढच्या काही दिवसांमध्ये भाजपचे ‘साडेतीन लोकं’ हे अनिल देशमुख यांच्याच कोठडीत असतील आणि देशमुख हे बाहेर असतील, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला. त्यामुळे आता शिवसेना भवनातील पत्रकारपरिषदेत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. भाजपचे नेते आम्हाला धमक्या देतात काय? हमाम मे सब नंगे होते है. मी काय बोलतोय, हे भाजप नेत्यांना चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची झोप उडाली आहे. आता त्यांनी जे उखाडायचं आहे, ते उखाडा, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

संजय राऊत ईडीवर काय बोलणार?

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत आणि सुजीत पाटकर हे ईडीच्या कचाट्यात सापडलेले आहेत. या मुद्द्यावरुन संजय राऊतही अडचणीत येणार असल्याचा दावा भाजपचे नेते सातत्याने करत आहेत. मात्र, संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील पत्रकारपरिषदेत ‘ईडी’वर आगपाखड केली होती. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी काहीजणांना माझ्याशी संपर्क साधला होता. मात्र, मी या कटात सहभागी होण्यास नकार दिल्याने ‘ईडी’च्या माध्यमातून मला लक्ष्य केले जात आहे. ईडीचे अधिकारी माझ्याशी संबंधित असलेल्या लोकांना त्रास देत आहेत. माझ्याविरुद्ध जबाब देण्यासाठी या लोकांवर दबाव आणला जात आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही पत्र पाठवले होते. हे पत्र म्हणजे ट्रेलरही नाही. येत्या काही दिवसांमध्ये ईडीचे अधिकारी कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, हे मी उघड करेन. त्यासाठी मी शिवसेना भवनात आणि मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकारपरिषद घेईन, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. त्यामुळे आता सर्वांनाच संजय राऊत काय बोलतात, याची उत्सुकता लागली आहे.


Back to top button
Don`t copy text!