महापुरुषांच्या विचारांची आजही गरज – स्वाती ढवाण

जिजाऊ सेवा संघाच्या वतीने सर्व क्षेत्रातील महिलांचा सन्मान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ जानेवारी २०२५ | बारामती |
केशवपन, सतीची चाल बंद करून इंग्रज सरकारच्या सहकार्याने कायदा आणून राजामोहन रॉय यांनी भारतीय महिलांना मानाचे स्थान दिले. महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दरवाजे उघडले व आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विधवा महिलांना मकर संक्रांतीनिमित्त, हळदीकुंकवाचा मान मिळणे गरजेचे असून स्त्रियांसाठी महापुरुषांनी केलेले कार्य कौतुकास्पद व उल्लेखनीय आहे. आजही महापुरुषांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन बारामती तालुका जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी केले.

बारामती तालुका मराठा सेवा संघप्रणित महिलांसाठी असलेल्या जिजाऊ सेवा संघाच्या वतीने शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी जिजाऊ भवन येथे महिलांसाठी संक्रांतीचे औचित्य साधत सर्व महिलांसाठी हळदीकुंकू तीळगुळ वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी स्वाती ढवाण यांनी आपले मत व्यक्त केले व विविध क्षेत्रातील महिलांना हळदीकुंकू या कार्यक्रमांमध्ये समाविष्ट करून घेतले.

याप्रसंगी जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण, मराठा सेवा संघाच्या विश्वस्त छाया कदम, माजी नगराध्यक्षा जयश्री सातव व जिजाऊ सेवा संघाच्या उपाध्यक्षा मनिषा शिंदे, कार्याध्यक्षा सुनंदा जगताप, सहकार्य कार्याध्यक्षा भारती शेळके, सचिव कल्पना माने, सहसचिव ऋतुजा नलवडे, खजिनदार सारिका मोरे, सहखजिनदार मनीषा खेडेकर, विना यादव, वंदना जाधव, उज्ज्वला शेळके, संगीता साळुंखे, सुवर्ण केसकर, गौरी सावळे पाटील, पूजा खलाटे, राजश्री परजणे, विद्या निंबाळकर व बारामती शहर व तालुक्यातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

कष्टकरी, नोकरदार, शेतकरी तसेच गृहिणी या महिलांचे सततचे धावपळीचे जीवन, रोजचा ठरलेला दिनक्रम असतो. यातून चार क्षण आनंदाचे मिळावेत, महिलांशी हितगुज व्हावे, विचारांची आदान-प्रदान व्हावे, या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी सांगितले.

या कार्यक्रमात सुमारे २००० महिलांनी सहभाग घेतला. सर्व महिलांना अल्पोहार तसेच तीळगुळाबरोबर संक्रांतीच्या वाणाचे वाटप करण्यात आले. महालक्ष्मी देवीचे पूजन, आरास व सजावट हे खास वैशिष्ट्य ठरले.

आभार उपाध्यक्षा मनिषा शिंदे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!