स्थैर्य, सातारा, दि. ०४ : तीन दिवसांपूर्वी दोन मृत भ्रृण शौचालयात आढळून आली होती. ती भ्रृण काढणाऱ्या सफाई कामगारास कामावरुन काढण्यात आले होते. ही बाब सहन न झाल्याने तो कर्मचारी वैफल्यग्रस्त होवून आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते. त्याला आत्महत्येपासून रोखण्यामध्ये रिपाइंचे दादासाहेब ओव्हाळ यांना यश आले. त्यांनी आज त्याचा जिल्हा रुग्णालयाच्या आवारात फुलांचा हार घालून सत्कार केला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करुन संबंधित दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या वॉर्ड नंबर 5 मधील शौचालयात दोन मृत भ्रृण आढळून आले होते. ते भ्रृण बाहेर काढताना व्हिडिओ व्हायरल झाल्याचा ठपका ठेवून सफाई कामगार विनोद मकवाना यास तडकाफडकी कामावरुन कमी केले.
अगोदरच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. नोकरी हातची गेल्याने मकवाना हे नैराश्येत येवून आत्महत्या करण्याचा विचार करु लागले होते. घरात एकटेच असताना त्यांनी तसा प्रयत्नही केला. त्याच्या कुटुंबियांनी त्यास परावृत्त करण्याचा प्रयत्न केला ही परंतु जेव्हा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांना याची माहिती मिळताच त्यांनी घरी जावून त्यास रोखले. त्यास भावनिक आधार मानसिक पाठबळ दिले. आज त्याचा जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच रिपाइंच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रकरणी चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.