स्थैर्य, फलटण : वन विभागाच्या परिश्रमानंतरही टाकळवाडे, ता. फलटण गावच्या हद्दीतील बिबट्या अद्याप जेरबंद झाला नाही, तथापी बिबट्या टाकळवाडे परिसरातच असल्याची खात्री झाल्याने दोन्ही पिंजरे आणि कॅमेरे आहे दिशा बदलून लावण्यात आले असून वन विभागाच्या माध्यमातून शोध जारी असल्याचे फलटण विभागाचे वन क्षेत्रपाल यु. एम. निकम यांनी सांगितले.
सहाय्यक वन संरक्षक सातारा एस. बी. चव्हाण, वन क्षेत्रपाल फलटण यु. एम. निकम, वन खात्याचे अन्य अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी गुरुवारी रात्री उशीरा पर्यंत टाकळवाडेसह मिरढे, कुरवली, बरड, गुणवरे, निंबळक परिसरात बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला, त्यातून बिबट्या टाकळवाडे परिसरात असल्याची खात्री झाल्याचे वन क्षेत्रपाल निकम यांनी स्पष्ट केले आहे.
बिबट्या शोध मोहीम सुरु आहे, परंतू तो मिळून येत नसल्याने टाकळवाडे परिसरात दहशत कायम आहे. त्यात भर म्हणून टाकळवाडेतील पाटील वस्तीवर मादी बिबट्यासह तिच्या दोन पिल्लांना काही ग्रामस्थांनी घराच्याभोवती पाहिले असल्याने, ग्रामस्थांमध्ये आणखीनच भिती बळावली आहे. तसेच याच दिवशी रात्री उशीरा निंबळक परिसरात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला चढवला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे केवळ टाकळवाडे नव्हे संपूर्ण परिसरात बिबट्याची दहशत व भीती कायम असल्याचे दिसून येत आहे.
टाकळवाडे ता. फलटण येथील 28 फाटानजीक असणार्या पाटील वस्तीवर मंगळवारी रात्री 9.30 च्या सुमारास हरिभाऊ सुभेदार मिंड यांच्या घराच्या ओट्यावर घरातील व्यक्तींना बिबट्यासारखे काहीतरी बसल्यासारखे दिसून आले. त्यावेळेस घरातील सर्व व्यक्तींनी ओट्यावर जाऊन पाहिल्यानंतर थोडा आवाज झाल्यानंतर ती पिल्ले घरामागील मोकळ्या रानात जाऊन बसली. मिंड याचा पाळीव कुत्रा त्यांच्या अंगावर धाऊन गेल्यानंतर ट्रॅक्टर चालु करुन तिकडे प्रकाश टाकला असता ती पिल्ले बिबट्याचीच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मिंड यांनी तात्काळ गावातील लोकांना फोन वरुन याबाबतची खबर दिल्यानंतर नानासो उर्फ पिंटु इवरे व काही तरुण हे घटनास्थळी आले व वनविभागाला देखील त्यांनी सदर घटनेची माहिती दिली.
वनविभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास निंबळक येथील इरिगेशन बंगला 29 फाटा लगत असणार्या करे वस्तीवरील करे गुरुजी यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करुन अमर निंबाळकर यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्या सदर कुत्र्याला घेऊन गेला. करे वस्ती येथे बिबट्याचे ठसे आढळून आले असून या परिसरातही वनविभागाने पिंजरा लावला आहे.
यापूर्वी वनविभागाने टाकळवाडा येथील नाझीरकर वस्तीलगत एक पिंजरा लावला असून अनेक दिवसापासून याठिकाणी बिबट्या पिंजर्याच्या अवतीभवती फिरत आहे मात्र पिंजर्याच्या आतमध्ये प्रवेश करत नसल्याने या सापळ्यात बिबट्या अद्यापही सापडला नाही.
दरम्यान, टाकळवाडे ग्रामस्थांनी मादी बिबट्यासह दोन पिल्लांना पाहिल्याने तसेच यापूर्वी मिळालेले ठसे नर बिबट्याचे असल्याने या परिसरात नर-मादी व त्यांची दोन पिल्ले यांचा वावर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे..