
दैनिक स्थैर्य । 18 एप्रिल 2025। सातारा । मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ सहा महिने ऐवजी आकरा महिने करण्यात आला आहे. या योजनेतंर्गत प्रशिक्षणार्थी यांचे विद्यावेतन DBT द्वारे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. ज्या उमेदवारांनी 10 मार्च, 2025 किंवा त्यापूर्वी आपले सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थी यांना उर्वरित पाच महिने कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
पाच महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्यस्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छूक उमेदवारांची आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी संबंधित सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विााग, सातारा यांच्याकडे सादर करणे अनिवार्य आहे. यापुढे adhar Seeded DBT होऊ शकेल. त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी बँक खाते adhar Seeding करून घ्यावी. तसेच ज्या आस्थापना हे या योजनेतंर्गत प्रशिक्षणार्थी घेण्यास इच्छूक आहेत त्या आस्थापनांची शासन निर्णयानुसार कार्य प्रशिक्षणार्थी सामावून घेण्याची क्षमता आवश्यक कागदपत्रांची तपासणी/पडताळणी करूनच उमेदवारांना आस्थापनेवर रुजू करून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी कळविले आहे.