दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२१ । सातारा । साताऱ्याच्या व्यंकटपुरा पेठेतील जुन्या घरातील तुळजाभवानी देवी मंदिरातील प्रचीन देवी, देवतांच्या 50 हजार रुपये किंमतीच्या मूर्ती चोरुन नेल्याची घटना घडली होती. दोन दिवसात स्थानिक गुन्हे शाखेने हा गुन्हा उघड करत रोहित विनायक दीक्षित याला अटक केली असून, त्याच्याकडून 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 1 ऑक्टोबर रोजीपूर्वी व्यंकटपुरा पेठेतील जुन्या घरातील तुळजाभवानी मंदिरातून मूर्ती चोरुन नेल्याची तक्रार दि. 7 ऑक्टोबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना आरोपीबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी उपनिरीक्षक गणेश वाघ व त्यांच्या पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
तपास पथकाने याप्रकरणी रोहित विनायक दीक्षित यास ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मूर्तींपैकी त्याने 35 हजार रुपये किंमतीच्या 7 मूर्ती हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याला पुढील कारवाईसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.