दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । फलटण । फलटण शहर व तालुक्यात मोठ्या संख्येने शिंपी समाज असून सर्वांनी एकत्रितपणे समाजाच्या सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई हायकोर्टातील जेष्ठ विधीतज्ञ ऍड. विश्वनाथ टाळकुटे यांनी केले.
शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट व शिंपी समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार संजय जामदार, सुभाष भांबुरे, विजय उंडाळे यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल अॅड.टाळकुटे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते .
समाजामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने समाजाचे ऋण फेडण्याचे प्रयत्न करीत असतो. त्याच बरोबर स्वतःची प्रतिभा संपन्न करण्याच्याही प्रयत्नात ते असतात. संजय जामदार यांनी आध्यत्मिकतेकडे वळून 5 हजार 500 कि.मी.ची ’नर्मदा परिक्रमा’ सारखी अवघड यात्रा पुर्ण केली. तसेच पत्रकार सुभाष भांबुरे यांना मिळालेला दर्पण पुरस्कार आणि शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे विजय उंडाळे यांनी उत्तम प्रकारे संभाळलेली अध्यक्ष पदाची धुरा अत्यंत जबाबदारीने पार पाडून मंदिरामध्ये आवश्यक ते चांगले बदल घडवून आणले असल्याचे ऍड. टाळकुटे यांनी सांगितले.
या सर्वांनी समाजाप्रती असलेली आपली भावना आपल्या कार्यातून प्रकट केली असून त्यांचा कौतुक सोहळा होणे क्रमप्राप्त होते. यामध्ये समाजातील जेष्ठ राजेश हेंद्रे आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पद्मा टाळकुटे यांनी परिश्रम घेऊन सत्कार सोहळा पार पाडला ही बाब कौतुकास्पद असल्याचेही ऍड. टाळकुटे यांनी स्पष्ट केले.
राजेश हेंद्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे नियोजन केले तर महिला अध्यक्ष सौ.पद्मा टाळकुटे यांनीही आपले विचार व्यक्त केले. आभार शेखर हेंद्रे यांनी मानले.
कार्यक्रमास विठ्ठल मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीकांत मुळे, सुनील पोरे, राजेंद्र कुमठेकर, शेखर हेंद्रे, राजाभाऊ गाटे, संतोष बाचल, राम गाणबोटे, रामकृष्ण जामदार, देवेंद्र हेंद्रे, नितीन चांडवले, प्रकाश टाळकुटे, अंजली कुमठेकर, धनश्री पोरे, कल्पना टाळकुटे, स्मिता हेंद्रे, वसुधा भांबुरे, सौ. जामदार यांच्यासह शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.