विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य जाणून घेण्याच्या उद्देशाने ब्रेनलीने केले सर्वेक्षण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | घरूनच अभ्यास करण्याबाबत दृष्टिकोनात झालेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाले, याचा अंदाज घेण्यासाठी जगातील सर्वात मोठा ऑनलाइन शिक्षणाचा प्लेटफॉर्म ब्रेनलीने नुकतेच भारतीय युजर्सबाबत एक सर्वेक्षण केले आहे. यात ऑनलाइन शिक्षणाच्या व्यासपीठांमुळे विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाले असल्याचे निदर्शनास आले. जसे की, शालेय धड्यांतील संकल्पना आणखी स्पष्ट होण्यात मदत करणे, गृहपाठात मदत करणे आदी. ६३% विद्यार्थ्यांनी घरून अभ्यास करत असताना ऑनलाइन लर्निंग प्लेटफॉर्ममुळे तणाव घटल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

जागतिक मानसिक आरोग्यदिनी पार पडलेल्या या सर्व्हेत १,७६४ जणांनी भाग घेतला. यातून विद्यार्थी आपला तणाव आणि मानसिक आरोग्याच्या चिंतांचे कसे व्यवस्थापन करतात, याची सखोल माहिती मिळवण्यात उपयोग झाला. सर्व्हेतील निष्कर्षांनुसार, ३४% उत्तरदात्यांनी आपल्या सभोवतालात मानसिक आरोग्याशी संबंधित तुच्छतादर्शक उल्लेखाची पातळी कमी झाल्याचे सांगितले आहे. यातून मानसिक आरोग्याविषयक चिंता दूर करण्याच्या महत्त्वाबाबत आई-वडील, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांत जागरूकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. या काळात ७५% विद्यार्थ्यांनी आपल्या मानसिक आरोग्यात बदल झाल्याचे नोंदवल्यामुळे ही वाढलेली जागरूकता एक सकारात्मक संकेतही देत आहे.

विषाणूच्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांना ध्यानीमनी नसताना ऑनलाइन शिक्षणाकडे वळावे लागले आहे. शिवाय त्याचा अवलंब करण्याशिवाय विद्यार्थ्यांकडे दुसरा पर्यायही उरला नाही. तथापि, ७१% विद्यार्थ्यांनी हा अतिशय वेगवान बदल आणि त्यानंतरच्या महिन्यांत आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, ३०% विद्यार्थ्यांनी शाळेतील आपली कामगिरी आणि शैक्षणिक तयाऱ्यांमुळे आपल्या चिंतेत अधिकच भर घातल्याचे मान्य केले आहे. याशिवाय ६३% विद्यार्थ्यांनी इंटरनेट वापर व स्क्रीन टाइममध्येही वाढ झाल्याने शारिरीक आणि मानसिक तणाव आल्याचे सांगितले. ५६% उत्तरदात्यांनी सांगितले की, त्यांना मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचा शारिरीदृष्ट्या फटका वजनात वाढ किंवा घट झाल्याच्या रूपात बसला.

विद्यार्थ्यांवर कोविड-१९ चा गंभीर परिणाम झाल्याबद्दल दुमत नाहीच. सुदैवाने मानसिक आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्याचे विद्यार्थ्यांना अनेक उपायही सापडले आहे. ३५% विद्यार्थ्यांनी उपचारांची वाट चोखाळली, तर मानसिक आरोग्याच्या चिंतांबद्दल ५० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्यांचे मित्र व कुटुंबीयांशी संवाद साधत दिलासा मिळवला. अनेक विद्यार्थ्यांनी कला-संगीत (४५%), सोशल मीडिया (३८%), तर (३२%) मुलांनी शारिरीक हालचालींच्या माध्यमातून आपला तणाव घटवला.

ब्रेनलीचे प्रोडक्ट ऑफिसर राजेश ब्यासनी म्हणाले की, कोविड-१९ महामारीमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य गर्तेत सापडले आहे. विद्यार्थी आपला बहुतांश वेळ घरीच घालवत असल्यामुळे ते मित्र, शिक्षकांच्या साथसोबतीपासून अचानक वंचित झाले आहेत. यामुळे त्यांच्यात एकाकीपणा, सामाजिक विलगता आणि शिक्षणात पिछाडीवर पडण्याच्या समस्या उद्भवणे सहाजिकच आहे. सुदैवाने ऑनलाइन प्लेटफॉर्म मग ते अभ्यासासाठी असोत की शिक्षक-गुरूंसोबत कनेक्ट होण्यासाठी असोत; या कठिण काळात विद्यार्थ्यांना प्रेरित आणि सहभागी होण्यात अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. या न्यू नॉर्मलचा सामना आणि त्याच्यासोबतच पुढे जाण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी ऑनलाइन टूल्सचा वापर करत आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत हा कल कायम राहण्याची शक्यता आहे.”


Back to top button
Don`t copy text!