सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड : “सुभाषराव उर्फ भाऊ शिंदे”

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


फलटण तालुक्यातील गोरगरीब, सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड असलेल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाषराव उर्फ भाऊ शिंदे यांचा सोमवार, दिनांक 3 मार्च 2025 रोजी प्रथम पुण्यस्मरण दिन. त्यानिमित्ताने….

तसा सुभाषरावांचा आणि माझा स्नेहसंबंध फलटणचे एक हरहुन्नरी संपादक वर्धमान शहा यांच्यामुळे सन 1978 पासून. मी तेव्हा दै.‘लोकसत्ता’ चा फलटण प्रतिनिधी होतो. त्यावेळी तालुक्यात आ.डॉ.कृष्णचंद्र भोईटे यांचा गट प्रभावी होता. त्यांचे बिनीचे शिलेदार हणमंतराव पवार, सुभाषराव शिंदे व डॉ.विजयराव बोरावके असे होते. त्यातील सुभाषराव शिंदे उंच, गोरेपान, बेधडक, निर्भिडपणे परखड बोलणारे असे हे व्यक्तिमत्त्व. पुढे त्यांच्याशी मैत्री जमली; दोघांनीही 45 वर्षे ती जपली आणि अचानकपणे पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील त्यांच्या आजारपणातील दि.13 मार्च 2024 रोजी घेतलेल्या सायं.6 च्या शेवटच्या श्‍वासाने ही मैत्री थांबली, ती कायमचीच !

सुभाषराव तसे मुळातच बंडखोर प्रवृत्तीचे. मैत्रीत, राजकारणात कपटकारस्थान, विश्‍वासघात, द्वेष सारे काही त्यांनी अनुभवले. शिंदेवाडी हे त्यांचे गाव. राजकारणात आले तेव्हा 20-22 वयातले. सहकार महर्षि अ‍ॅड. मुगुटराव भोईटे यांच्यामुळे ते सहकारी जिनिंगमध्ये संचालक झाले. पुढे इफको या राष्ट्रीय खत कारखान्याचे संचालक झाले. डॉ.कृष्णचंद्र भोईटे आणि चिमणराव कदम या दोन गटात त्यावेळी धुमश्‍चक्री असायची. त्या संघर्षात सुभाषराव पुढे असायचे. अगदी शिवीगाळ, हाणामारी करण्याची परिस्थिती येईपर्यंत. यशवंत सहकारी बँकेत शेअर्स गोळा करायला सर्वात पुढे. संचालक, चेअरमन झाले. पुढे फलटण तालुका दूध संघाचे अध्यक्ष, सातारा जिल्हा खरेदी विक्री संघ, गावची सोसायटी, डेअरी, ग्रामपंचायत यातही वरचढ अशा माध्यमातून सतत पुढे. श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या डॉ.भोईटे गटाच्या अटीतटीच्या निवडणूकीत पॅनेल विजयासाठी आणि नंतर सामान्य शेतकर्‍याचा कार्यकर्ता मुलगा हणमंतराव पवार यांना अध्यक्ष करण्यामध्ये व फलटण तालुक्याच्या राजकारणातील, सहकारातील एक नवे पर्व सुरु करण्यातील त्यांचा पुढाकार लक्षणीय. पुढे डॉ.भोईटे गट सोडून प्रथम विजयराव बोरावके गेले, हणमंतराव पवार गेले आणि नंतर सुभाषरावांनीही सवता सुभा शिंदेगढ थाटला. त्यांची मुळत: विचारसरणी काँग्रेस पक्षाशी ! त्यामुळे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण हे त्यांचे दैवत. यशवंतरावांचेही या तरुण कार्यकर्त्यावर तेव्हढेच प्रेम होते. त्याचाही मी साक्षीदार आहे. केवळ सुभाषराव शिंदे या तरुण काँग्रेस कार्यकर्त्याला ताकद द्यायची म्हणून ते स्वत: जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांचा विरोध असतानाही हेलीकॉप्टरने सुभाषरावांच्या शिंदेवाडी या गावातील कार्यक्रमासाठी खास आले होते.

त्यावेळी त्याच्या सत्कारात साहेबांना काय द्यायचे या चर्चेत मी होतो. मी सुचविले होते की, सौ.वेणूताईंचे हसरे, लोभस असे तैलचित्र द्यायचे. सुभाषरावांना ही कल्पना आवडली. वर्धमान शहा व मी दोघांनी मिळून खास चित्र फ्रेम केली. समारंभात चव्हाणसाहेबांचा गुलाबपुष्पाचा मोठा हार, शाल, चांदीची गणेशमूर्ती वगैरे सर्व देऊन झाल्यावर रेशमी वस्त्रात गुरफटलेली ती फ्रेम त्यांच्या हातात सुभाषरावांनी दिली. त्यावेळी साहेबांसकट सर्व उपस्थितांची कशाची फ्रेम आहे ही उत्सुकता ताणली गेली होती. साहेबांनीही ‘हे आणि काय आता सुभाष?’ असे विचारताच सुभाषराव म्हणाले, ‘‘तुम्हीच उघडून पहा ना.’’ साहेबांनी अगदी अलगदपणे रेशमी वस्त्र बाजूला केले आणि त्यांची प्रिय पत्नी वेणूबाईंचे सुंदर चित्र पाहिले आणि साहेबांच्या डोळ्यात पाणीच थरथरले. एखाद्या हिरव्यागार पानावरचे दवबिंदू ओघळावे तसे साहेबांच्या डोळ्यातले अश्रूंचे काही थेंब त्या चित्रावर पडताच जणू त्यांची प्रिय पत्नी वेणूबाईसुद्धा थरारुन गेल्या. न राहवून साहेबांनी ते चित्र सर्व उपस्थितांना दाखविताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि गहिवरलेल्या साहेबांनी सुभाषरावांचे हात हातात घेऊन शब्दांशिवाय अश्रूपूर्ण नजरेनेच कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी इतरांची भाषणे चालू असताना, मला आठवते किसनवीर व डॉ.भोईटे यांची असावीत. त्यावेळी चव्हाणसाहेब सुभाषरावांच्या कानात काही राजकीय मंत्र सांगत होते. सुभाषरावांनी अर्थातच 2-3 दिवसांनी आम्हाला सांगितले. पण तो राजकीय मंत्र, सूत्र सुभाषरावांना प्रत्यक्षात अंमलात आणता आला नाही. काही तालुकास्तरीय राजकारणामुळे, पण अंमलात आणला असता तर सुभाषराव नंतर सातारा जिल्ह्यातले प्रमुख नेते व सत्तेतही दिसले असते. पण ते होणे नव्हते.

पुढे राजकारणात त्यांना फलटण तालुका सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत अपयश आले. संघाची सत्ता गेली. तालुक्याच्या त्यांच्या राजकारणावर याचा परिणाम झाला. परंतु सुरुवातीपासूनच शरद पवार यांच्यावर निष्ठा असल्यामुळे त्यांच्या व अजितदादांच्या माध्यमातून त्यांचे राजकारण, समाजकारण चालूच होते. पुढे अगदी अलिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तरी सुभाषरावांनी शरद पवारांच्यावरील निष्ठा सोडली नाही. त्यांच्या पक्षाचे काम एकाकीपणे करायला त्यांनी सुरुवात केली होती. फलटण तालुक्यात माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा भाजप पक्ष, दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची सत्ता अशा अवघड परिस्थितीमधूनसुद्धा त्यांनी सत्तेच्या मागे न जाता सत्तेत नसलेल्या शरद पवारांवरील निष्ठा न सोडता त्यांचा पक्ष पुन्हा फलटण तालुक्यात वाढविण्यासाठी सुभाषरावांनी हे आव्हान स्वीकारले होते.

माझ्या पत्रकारितेतील कामाला सदैव पाठींबा

1975 पासून त्यांची ओळख झाल्यावर माझ्या पत्रकारितेसाठीही त्यांनी सदैव पाठींबा दिला. 1981 साली मी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा सचिव असताना माजी आमदार हरिभाऊ निंबाळकर परिषद अध्यक्ष झाले. त्यानंतर परिषदेचे अधिवेशन फलटणला अत्यंत दिमाखदार व न भूतो न भविष्यती असे झाले. त्यात डॉ.कृष्णचंद्र भोईटे, हणमंतराव पवार, सुभाषराव शिंदे व विजयराव बोरावके यांचे श्रेय मोठे होते. मी मार्च 1980 पासून ‘लोकजागर’ वृत्तपत्र सुरु केले. त्यासाठीही त्यांनी सुरुवातीपासून सहकार्य केले. पुढे सन 1987 (6 जानेवारी) मध्ये राज्यातल्या मी माझ्या काही ज्येष्ठ पत्रकारांच्या सहकार्याने ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ ही राज्यस्तरीय संस्था सुरु केली. त्याचे ते सदस्य झाले. त्यानंतर या संस्थेने हाती घेतलेल्या ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारक कार्याला त्यांनी सुरुवातीपासूनच काही आर्थिक सहकार्य केले होते. ते स्वत: 2 वेळा पोंभुर्ले, जि.सिंधुदुर्ग येथील स्मारक कार्याला भेट देण्यासाठी आले होते.

मराठी पत्रकार परिषदेच्या तत्कालीन नेतृत्त्वाने केवळ व्यक्तीद्वेष व आम्ही हाती घेतलेल्या आणि यशस्वी झालेल्या ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारक कार्य याचा मत्सर म्हणून माझ्या व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विरोधात महाराष्ट्रात व विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात विनाकारण संघर्षाची आघाडी उचलली होती. त्या काळात मुंबईचे काही पत्रकार डॉ.पतंगराव कदम व सुभाषराव शिंदे यांना भेटले होते. ‘‘रविंद्र परिषदेला न विचारता स्मारकाचे काम करतो, कशाला तुम्ही सहकार्य करता’’ वगैरे वगैरे. पण दोघांनीही त्यांना योग्य उत्तर देऊन स्मारकासाठी सक्रीय पाठिंबा दिला. ‘‘रविंद्रचे जांभेकर स्मारक हा त्याचा ध्यास आहे. फलटणहून एवढ्या लांब जाऊन तिथे राज्यातले पहिले स्मारक उभारले याचा आम्हा फलटणकरांना अभिमान आहे. तुम्हाला मदत करता येत नसेल तर निदान चांगल्या कामाला विरोध तरी करु नका’’, असेच त्यांनी सर्वांना सुनावले.

शरद पवार पुस्तकाचे ऐतिहासिक काम

एकदा शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना विविध कल्याणकारी कार्य केल्याबद्दल फलटणला त्यांचा नागरी सत्कार घ्यायचा होता. त्याचे नियोजनात मीही होतो. माळजाई मैदानावर सुभाषरावांनी 1 लाख शेतकरी, कार्यकर्ते जमवून पवारसाहेबांचा जंगी सत्कार केला होता. पवार साहेब सातारा जिल्ह्यात जिथे येतील तिथे जाऊन त्यांच्या उंचीचा गुलाबाच्या फुलांचा भव्य हार घालून त्यांचे स्वागत करायचे ही सुभाषरावांची खासियत.
तसेच पवारसाहेबांच्या 51 व्या वाढदिवसादिवशी त्यांनी घेतलेले अनेक कल्याणकारी कार्याबद्दल एक छोटी पुस्तिका काढायची अशी त्यांची कल्पना. त्याचे लेखन, संपादन मी केले होते. मुंबईला जाऊन साहेबांच्या हस्ते त्याचे प्रकाशन केले. साहेबांना व अनेक लोकांना ही पुस्तिका आवडली. त्यावेळी सुभाषरावांनी मोठ्या मनाने या पुस्तिकेचे लेखक, पत्रकार म्हणून माझी साहेबांशी ओळख करुन दिली. तिथून साहेबांशी माझा परिचय दृढ होत गेला तो आजपर्यंत. पुढे मी ही कल्पना दरवर्षी करुया असे सुभाषरावांना सुचविले. त्यांनी मान्य केले. दरवर्षी या पुस्तकात नाविन्य असायचे. पुस्तक चार रंगी आर्टपेपरवर व पाच हजार प्रती व पाने सव्वादोनशे ते अडीचशे. आत साहेबांचे, कुटुंबियांचे फोटो, साहबांची प्रदीर्घ मुलाखत, त्यांचे कार्य, अजितदादा, सौ.सुप्रियाताई सुळे, सौ.सुनेत्रावहिनी पवार, त्यांची मुले यांचे फोटो, मुलाखती असा भरभक्कम मजकूर त्यात असे. साहेब वाढदिवसादिवशी 12 डिसेंबरला जिथे असतील तिथे जाऊन त्यांच्या हस्ते प्रकाशन व मान्यवर नेते, पत्रकार यांना ही आकर्षक पुस्तके देणे हा त्यांचा एक अफलातून छंदच होता. सलग 25 वर्षे म्हणजे पवारसाहेबांच्या अमृत महोत्सवापर्यंत सुभाषरावांनी जिद्दीने हा उपक्रम राबविला.

आमच्या लोकजागर कार्यालयात तर ते आवर्जून आले की 2-3 तास सलग गप्पा होत असत. ‘तुम्ही पवारसाहेबांकरिता इतके प्रेमाने करता, त्यांनी तुम्हाला काय दिले? बास करा आता हे प्रेम’ असे आम्ही, काही जवळच्या मित्रांनी, अगदी त्यांच्या घरातल्या सर्वांनीच त्यांना सांगितले होते. त्यावर त्यांचे एकच उत्तर, ‘‘पवारसाहेबांना मी काहीही मागणार नाही. त्यांनी काही दिले, नाही दिले तरी मी माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणूनच राहणार !’’ आणि खरंच त्यांनी हे सिद्ध करुन दाखवले.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुभाषरावांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना पुण्याच्या रुबी हॉलमध्ये दाखल करायचे ठरले. मी तेव्हा योगायोगाने पुण्यातच होतो. सुभाषरावांना रुबी हॉलला आणणार आहेत हे समजल्यावर मी पुण्यातले कार्यक्रम संपले आणि अ‍ॅम्ब्युलन्सची वाट बघत रुबी हॉलमध्ये थांबलो. सायं.साडेपाचच्या सुमारास अ‍ॅम्ब्युलन्स आली आणि स्ट्रेचरवरुन सुभाषरावांना खाली आणले. मला पाहताच सगळेच थांबले. हातात हात घेऊन म्हणालो, ‘‘काय हे सुभाषराव?’’. त्यावर ते म्हणाले, ‘‘काही होत नाही रविंद्र, 2-3 दिवसात खणखणीत बरा होतो. मग जाऊया आपण साहेबांकडे आपले काम सांगायला.’’ त्यांना सीसीयु मध्ये दाखल केले, त्यांना परत 2-3 वेळा भेटलो. तब्येतीत चढ-उतार होत होता. ‘एव्हढा सतत कार्यरत असणारा, कोणालाही धडक – बेधडक बोलणारा, बंगल्यावर डायनिंग टेबलवर जेवत असतानाही सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा आणि जेवू घालणारा, स्पष्ट, परखड भाषणाने सभेचा फड गाजवणारे आणि साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फलटणमधून अफाट बळ देण्यासाठी स्वत:जवळ काहीही नसतानासुद्धा रात्रं दिवस झपाटलेल्या निष्ठेने वेड्यासारखे काम करणारा हा उंच तगडा, देखणा नेता’ अशा अवस्थेत बघणे म्हणजे कोणाच्याही मनात उलघाल करणारे असेच होते. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. आपला भक्त प्रल्हाद अडचणीत असताना विठ्ठल जसा धावून आला तसे पवारसाहेब याही वयात प्रचंड टेन्शन असतानाही सुभाषरावांना भेटण्यासाठी ‘रुबी’ मध्ये आले, म्हणाले, ‘‘सुभाषराव असे झोपून कसे चालेल. लवकर बरे व्हा. आपल्याला लढाई करायची आहे आणि जिंकायची पण आहे.’’

पण अखेर सुभाषराव, ही लढाई हरले आणि दि.13 मार्चला सायं. 6 वाजता एकुलता एक मुलगा चेतन, 6 मुली, जावई, नातू, पणतू आणि त्यांच्यावर प्रेम करणार्‍या हजारो कार्यकर्त्यांना सोडून गेले ते कायमचेच. फक्त लक्षात राहील ती त्यांची ‘निष्ठा’ आणि ‘जिद्द’ !

– रविंद्र बेडकिहाळ,

ज्येष्ठ पत्रकार, फलटण.


Back to top button
Don`t copy text!