जरंडेश्‍वर साखर कारखाना सुरुच राहिला पाहिजे; वेळप्रसंगी ईडीला सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांची ताकद निश्‍चितपणे दाखवून देणार : आ. शशिकांत शिंदे यांचा इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२१ । कोरेगाव । जरंडेश्‍वर साखर कारखाना हा शेतकरी हिताचा निर्णय घेणारा महाराष्ट्रातील एकमेव कारखाना ठरला आहे. सर्वच बाबतीत अग्रेसर असलेल्या या कारखान्यावर जाणीवपूर्वक राजकीय हेतूने ईडीमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. कारखाना चालू राहिला तर, 50 हजार ऊस उत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळणार आहे, जर कारखाना बंद पाडण्याचा कोणी प्रयत्न केला तर शेतकरी शांत बसणार नाहीत. ईडीने जर राजकीय खेळातून जरंडेश्‍वर कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास, ईडीला सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांची ताकद निश्‍चितपणे दाखवून देणार आहे, अशा स्पष्ट इशारा माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.

वडाचीवाडी, ता. कोरेगाव येथील सह्याद्रि मंगल कार्यालयात जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांसह कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आ. शिंदे बोलत होते. व्यासपीठावर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मंगेश धुमाळ, कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, बाळासाहेब सोळस्कर-पाटील, किरण साबळे-पाटील, संदीप मांडवे, प्रा. बंडा गोडसे, शिवाजीराव महाडिक, राजेंद्र भोसले, रमेश उबाळे, संजय पिसाळ, पै. सागर साळुंखे, सुरेखा पाटील, प्रतिभा बर्गे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आ. शिंदे पुढे म्हणाले की, जरंडेश्‍वर कारखाना हा जरी डॉ. शालिनीताई पाटील यांनी काढला होता, हे मान्य असले तरी त्यांना तो चालविता आला नाही, हे कटू सत्य आहे. 2010 सालापर्यंत 2500 मेट्रिक टन क्षमतेचा हा कारखाना होता, आज हा कारखाना 10 हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त क्षमतेने चालत असून, वीज निर्मितीसह डिस्टलरीची उभारणी केली आहे. आज कारखान्याच्या माध्यमातून हजारो रोजगार तयार झाले असून, 50 हजारांपेक्षा जास्त शेतकर्‍यांना त्याचा लाभ होत आहे. केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उच्चांकी दर देणारा आणि वेळेवर पेमेंट करणारा हा कारखाना असल्याने शेतकरी त्यालाच ऊस घालत आहेत, राजकीय द्वेषातून हा कारखाना बंद पाडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर शेतकरी ते खपवून घेणार नाहीत, शेतकर्‍यांची ताकद का असते, हे ईडीला दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला.

केवळ कोरेगाव-खटाव तालुकेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी जरंडेश्‍वर कारखान्यावर अवलंबून आहेत, आता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना विचारात घेतले जाणार असून, गावनिहाय मोहीम हाती घेतली जाणार आहे. ज्याप्रमाणे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत कार्यकर्ते घरोघरी जाऊन आपले विचार मांडतात, त्याच धर्तीवर कारखाना कसा होता आणि आता काय परिस्थिती आहे, हे शेतकर्‍यांना पटवून दिले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये गावनिहाय बैठकांचे नियोजन केले जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखान्यावर ईडीच्या अधिकार्‍यांना पाय ठेवू दिला जाणार नाही, त्यांना कारवाई करु देणार नाही, वेळप्रसंगी वेगवेगळी आंदोलने छेडली जाणार असून, शेतकरी काय असतो, हे केंद्र सरकारला आणि ईडीला दाखवून देऊ, असा इशारा आ. शिंदे यांनी दिला.

ईडी ही राजकीय बाहुली आहे, हे सतत दिसून येते. काहीही झाले की, भाजप ईडीचे नाव घेतले, ईडीचे सामान्य जनतेपुढे काहीच चालत नाही. केवळ राजकीय हेतूने खा. शरद पवार यांना चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर मुंबईत काय परिस्थिती निर्माण झाली होती, याचा मी साक्षीदार आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली, मोठा फौजफाटा आणला, मात्रसर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीपुढे सर्वच यंत्रणा हतबल बनल्या. वरिष्ठ अधिकार्‍यांनी खा. शरद पवार यांचे निवासस्थान गाठले, ईडीला सांगावे लागले की, आम्ही चौकशीला बोलावलेच नाही. एवढी मोठी ताकद तुमच्या-आमच्यात आहे. मुंबईत जसा इतिहास घडवला, तसाच इतिहास सातारा जिल्ह्यात जरंडेश्‍वर कारखानाप्रश्‍नी सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी घडवतील, यात तीळमात्र शंका नाही. ईडी येऊ अथवा अन्य कोणी, आम्ही एकदा का रस्त्यावर उतरलो की, आमची ताकद निश्‍चितपणे कळून येईल, असा इशारा आ. शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट शब्दात दिला.

सुनील माने म्हणाले की, आजवर वेगवेगळ्या पक्षांची सरकारे केंद्रात होती, त्यांनी कधीही शेतकर्‍याविषयी राजकारण केले नाही, त्यांना शेतकर्‍यांविषयी आस्था होती. आज केंद्रात असलेले भाजपचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने ईडीचा वापर करुन भाजप वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत, हे पूर्णत: चुकीचे आहे आणि शेतकर्‍यांवर अन्याय करणारे आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील जर म्हणत असतील की, आम्ही 41 कारखान्यांची तक्रार केली आहे, मग एकच आणि एकच म्हणजे जरंडेश्‍वर कारखान्यावर कारवाई का केली, त्याबाबत आता भाजप का बोलत नाही. आता शांत बसून चालणार नाही, ज्याप्रमाणे पश्‍चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन आमदारांना चौकशीसाठी बोलविण्याचे समजताच, रस्त्यावर उतरुन आंदोलन केले, त्याच धर्तीवर आपण मुंबईत आंदोलन छेडू, कोणत्याही परिस्थितीत शेतकर्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी लढा उभारला जाणार असून, त्यामाध्यमातून ईडीला धडा शिकवू, असा इशारा देखील त्यांनी दिला.
जरंडेश्‍वर कारखान्यावर जर कारवाई करण्याची ईडीने तयारी केली असली तरी त्यांना कारखान्यावर पाय ठेवू देणार नाहीत, एवढी शेतकर्यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे ईडी आली तरी तिला परत जाऊ देणार नाही, असा इशारा प्रदीप विधाते, राजाभाऊ जगदाळे प्रा. बंडा गोडसे, किरण साबळे-पाटील, शिवाजीराव महाडिक, बाळासाहेब सोळस्कर-पाटील, संदीप मांडवे, पै. सागर साळुंखे, संजय पिसाळ, प्रतिभा बर्गे यांनी आपल्या भाषणातून दिला. भास्कर कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अरुण माने यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!