दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । फलटण । फलटण तालुक्यात आरोग्य विभागाकडून सुरु असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेतील नियोजनाअभावी नागरिकांना लसीकरणापासून वंचित रहावे लागत असून मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन होणे आवश्यक असल्याचे मत तालुकावासियांमधून व्यक्त होत आहे.
सद्यस्थितीत राज्यात सर्वत्र 18 वर्षांपुढील सर्व वयोगटासाठी शासनाकडून मोफत कोरोना लसीकरण मोहिम सुरु आहे. त्यानुसार फलटण तालुक्यातही या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र लसीकरण केंद्रावर येणारे नागरिक आणि उपलब्ध लसींची संख्या यात मोठी तफावत राहत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. दि.13 जुलै पासून केवळ ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांनाच लसीकरण देण्यात येत असले तरी अनेकजण याबाबत अनभिज्ञ असल्याने तसेच रजिस्ट्रेशनबाबत अज्ञान असल्याने अशांना अजूनही लसीकरणापासून वंचित रहावे लागत आहे. तसेच आधीच लसींची कमी उपलब्धता आणि त्यात पहिला डोस व दुसरा डोस अशी विभागणी यामुळेही लसीकरणासाठी अनेकांना प्रतिक्षीत रहावे लागत आहे.
लसीकरण मोहिमेत सुसूत्रता आणण्यासाठी ‘माणदेशी’ प्रमाणे फलटण तालुक्यातील सामाजिक संस्थांनी प्रशासनासोबत संवाद साधून पुढाकार घेणे गरजेचे असून शासनस्तरावरुन तालुक्यात जास्तीत जास्त लसी उपलब्ध करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह राजकीय पुढार्यांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याची भावनाही नागरिक व्यक्त करत आहेत. फलटण शहरात वॉर्डनिहाय तर ग्रामीण भागात पंचायत समिती गणनिहाय व्यापक स्वरुपात लसीकरण शिबीरांचे आयोजन केल्यास लसीकरण मोहिम लवकरात लवकर यशस्वी होऊ शकते, असेही मत जाणकार व्यक्त करत आहेत.