दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२१ । कोरेगाव । ईडीने जप्त केलेल्या चिमणगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्याचा विषय आता दिल्ली दरबारात पोहोचला आहे. कारखान्याच्या संस्थापक-संचालक मंडळाने शनिवारी नवी दिल्लीत तळ ठोकला आहे. नव्याने केंद्रीय मंत्रिमंडळात उद्योग मंत्री म्हणून समावेश झालेले व डॉ. श्रीमती शालिनीताई पाटील यांचे निकटवर्तीय नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांना कारखानाविषयक निवेदन सादर केले.
ईडीने कारखाना जप्त केल्यानंतर संस्थापक-संचालक मंडळाने पुन्हा एकदा उचल खालली असून, शुक्रवारी दुपारी त्यांनी मुंबईतील ईडीच्या संयुक्त संचालकांची भेट घेऊन कारखाना सुरु ठेवावा, गळीत हंगाम चालू ठेवण्याविषयी मार्गदर्शन करावे, जेणेकरुन शेतकरी, कामगार आणि ऊस तोडणी वाहतूकदारांचे नुकसान होऊ नये, यासाठी मागणी केली होती. त्यानंतर रात्रीच संचालक मंडळाने नवी दिल्ली गाठली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव भोसले-पाटील, संचालक दत्तूभाऊ धुमाळ, शहाजी भोईटे, श्रीरंग सापते व किसनराव घाडगे यांनी कारखान्याविषयी चर्चा करुन सद्यस्थिती निदर्शनास आणून दिली. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना कारखान्यावर येऊन गेलो होतो, मला कारखान्याच्या उभारणीची सर्व माहिती आहे, डॉ. शालिनीताई पाटील यांनी घेतलेले कष्ट सुध्दा जाणून आहे, असे म्हणत मंत्री राणे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.