दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२१ । सातारा । महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने गृह राज्यमंत्री(ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प विद्यार्थीनींसाठी उपयुक्त ठरत असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थींनींनी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले आहेत.
सातारा जिल्ह्यात गृह आणि विविध विभागांच्या समन्वयातून महिलांच्या सुरक्षितेसाठी महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या पथदर्शी प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. श्री. देसाई हे या प्रकल्पाविषयी वेळावेळी आढावा घेऊन मार्गदर्शनही करतात. हा प्रकल्प सुरु झाल्यापासून जिल्ह्यातील महिलां व तरुणींवरील अत्याचारांचे प्रमाणही कमी झाले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थींनींनी श्री. देसाई यांची भेट घेऊन महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पामुळे आत्मविश्वास वाढल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी श्री. देसाई यांना पुष्पगुच्छ देवून आभार मानले आहेत.