दैनिक स्थैर्य | दि. ११ जुलै २०२४ | फलटण |
आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा उत्साहाने साजरा केला. ८ जुलै रोजी आयडियल इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी वारकर्यांच्या वेशभूषेमध्ये आपल्या पालकांसह चैतन्य विहार, विंचुर्णी रोड येथे पोहोचले. हरिभक्त पारायण केशवराव जाधव महाराज फलटण तालुका वारकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांच्या पादुका आणि विठ्ठल-रुक्माई मूर्तींचे पूजन झाले. तसेच आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या सेंटर हेड सुचिता जाधव, व्हॉइस प्रिन्सिपल सोफिया तांबोळी आणि आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या सेंटर हेड पूजा बाबर यांनी विठ्ठल मूर्तीला हार अर्पण करून मनोभावे पूजा केली.
चैतन्य विहार सिटीमधून आयडियलच्या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या दिंड्या दिंडी क्रमांक -१ ते दिंडी क्रमांक- १८ अशा प्रत्येक वर्गाची स्वतंत्र दिंडी होती. साक्षरता दिंडी, वृक्ष, ग्रंथ दिंडी, रोबोटीक्स दिंडी इ. दिंड्यांचा समावेश होता. दिंडीमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षक आणि पालक उत्साहाने हरिनामाचा गजर करत मुलांना प्रोत्साहित करत होते.
टाळ, चिपळ्या, मृदंग आणि हरिनामाच्या जयघोषामध्ये दिंडीचा विसावा अतिशय सुसज्ज अशा गार्डनमध्ये झाला. विसाव्याच्या ठिकाणी हभप केशवराव महाराज, संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. वैशाली शिंदे, डायरेक्टर शिवराज भोईटे, श्रद्धा शाह, स्कूल कमिटी मेंबर सागर बरकडे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींची आरती संपन्न झाली. विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षक यांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. यानंतर आयडियलच्या विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषांमध्ये अभंग, ओव्या सादर केल्या. तसेच संगीत शिक्षिका कु. संजना शिंदे यांनी ‘अभीर गुलाल’ हा अभंग आपल्या सूमधुर आवाजामध्ये विद्यार्थी आणि वादक काळे सर यांच्यासमवेत सादर केला.
प्रायमरी स्कूलच्या २०० विद्यार्थ्यांनी एकाचवेळी रुक्माई रुक्माई, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माऊली माऊली या गाण्यांवर सामूहिक नृत्य सादर करून नेत्रदीपक रिंगण केले. यामध्ये शिक्षिका आणि पालकही सहभागी झाले. माऊली माऊलीच्या ठेक्यावर सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी फुगड्या घातल्या.
इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘रेड्यामुखी वेद प्रसंग’ सादर केला. अशाप्रकारे अतिशय शिस्तबद्ध नियोजन आणि चैतन्य विहार या अतिशय सुरक्षित ठिकाणी जेथे मुलांना रोडवरून जाताना ट्राफिकचा त्रास नव्हता. मुलांची सुरक्षा आणि सर्व व्यवस्था डीएनजी ग्रुपचे मॅनेजर सतीश ठोंबरे सर यांनी केली होती.
उपस्थित पालक आणि चैतन्य विहार डीएनजी ग्रुप यांचे आभार मानून मुलांनी आपली शिदोरी खाऊन पालखी सोहळ्याचा अनुभव घेतला.