दैनिक स्थैर्य | दि. ३० नोव्हेंबर २०२४ | फलटण | नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात सचिन पाटील हे विजयी झाले आहेत. काल राजे गटाचा संवाद मेळावा सुद्धा संपन्न झाला आहे. त्यानंतर विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी “झालेल्या चुका मान्य करून संघर्षाला सुरुवात. सुरक्षित, आधुनिक, संपन्न सातारा जिल्ह्यासाठी” असे मत WhatsApp स्टेटस द्वारे व्यक्त केले आहे.
आगामी काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या चुकांचा उहापोह करून आगामी काळामध्ये झालेल्या चुका सुधारत संपूर्ण ताकतीने उतरण्याची तयारी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे करत आहेत का? यासोबतच आगामी काळामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे स्वतः पुढे येत चित्र बदलणार का? असे प्रश्न उपस्थित राहत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये सक्रिय प्रचार यंत्रणेमध्ये श्रीमंत रामराजे हे सामील झाले नव्हते. पडद्या मागे राहून श्रीमंत रामराजे हे कार्यरत होते. अगदी तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांनी खाजगी बैठका विधानसभेसाठी घेतल्या होत्या परंतु त्याचा फायदा राजे गटाला झाला असल्याचे चित्र दिसत नाही. त्यामुळे आगामी काळामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे स्वतः आता पुन्हा सक्रिय होणार का? असे प्रश्न उपस्थित राहत आहेत.