स्थैर्य, मुंबई, दि.१०: अमेरिकेतील महागाईसंबंधी प्रमुख आकडेवारी पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याने डॉलर अजूनही मजबूत स्थितीत आहे. परिणामी मंगळवारी, स्पॉट गोल्डचे दर ०.३ टक्क्यांनी वृद्धी घेत १८९३ डॉलर प्रति औसांवर स्थिरावल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
गुरुवारी सादर होणाऱ्या अमेरिकेच्या कंझ्युमर प्राइस आकडेवारीवर बाजाराचे बारकाईने लक्ष आहे. कारण यातून जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील महागाईसंबंधी संकेत मिळतील. अमेरिकी अर्थव्यवस्थेतील सुधारणेनंतर वाढत्या महागाईच्या चिंतेमुळे अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून चलन धोरण अधिक कठोर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉलरला अधिक आधार मिळाला.
अमेरिकी फेडरल रिझर्व्हने अर्थव्यवस्था रुळावर आणण्याकरिता व्याजदर जवळपास शून्याच्या आसपास ठेवले. तथापि, व्याजदरात वाढ केल्यास सोन्यातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. परिणामी किंमतीवर दबाव आला. जागतिक मध्यवर्ती बँकांनी संभाव्य महागाईच्या भीतीने घेतलेल्या सर्वसमावेशक भूमिकेमुळे गेल्या काही महिन्यात सोन्याचे दर वाढते दिसून आले.
कच्चे तेल: कालच्या व्यापारी सत्रात डब्ल्यूटीआय क्रूडचे दर १.२ टक्क्यांनी वाढून ७० डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. प्रमुख अर्थव्यवस्था पुन्हा सुरु होत असल्याने तेलाच्या मागणीत सुधारणा होण्याची चर्चा तसेच जागतिक बाजारात इराणी तेल येण्याची शक्यता कमी असल्याने क्रूड तेलाच्या दरांना आधार मिळाला. इराणच्या आण्विक कराराच्या नूतनीकरणाबद्दल तेहरान आणि जागतिक शक्ती यांदरम्यानच्या चर्चांवर मार्केटचे बारीक लक्ष असेल. तथापि, अमेरिकेच्या राज्य सचिवांनी तेहरानवरील निर्बंध हटवले जाण्याची कमी शक्यता वर्तवली.
अमेरिकेची प्रमुख आर्थिक आकडेवारी पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याने अमेरिकी चलन मजबूत झाले आणि क्रूड तेलाच्या दरात वाढ झाली. यामुळे डॉलरचे वर्चस्व असलेल्या क्रूड तेलावर दबावदेखील आला. मे २१२१ मध्ये (वार्षिक स्तरावर) चीनच्या क्रूड आयातीत १४.६ टक्क्यांची घट झाली. कठोर पर्यावरणीय नियमांमुळे तेथील तेल वापरावर मर्यादा आल्या. तेलाचा प्रमुख उपभोक्ता असलेल्या चीनकडून मागणीत घट झाल्याने बाजाराच्या भावनांवर परिणाम झाला आणि तेलाचे दर खाली आले.