
स्थैर्य, 7 जानेवारी, सातारा : मराठ्यांची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या सातारा येथे आयोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात साहित्यप्रेमींच्या अलोट आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गर्दीचा नवा उच्चांक गाठला गेला. त्याचप्रमाणे समाजमाध्यमांद्वारे देश-विदेशातील तब्बल साडेसात कोटी साहित्यप्रेमी दर्शकांनी संमेलनात सहभाग घेत समाजमाध्यमांच्या क्षेत्रातही नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे हे संमेलन खऱ्या अर्थाने ‘अटकेपार’ पोहोचले आहे, असे गौरवोद्गार संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. १ ते ४ जानेवारी या कालावधीत सातारा येथे आयोजित करण्यात आले होते. ३३ वर्षांनंतर सातारकरांना संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाल्याने संमेलन सर्वार्थाने ऐतिहासिक आणि विक्रमी करण्याचा मनोदय संमेलनापूर्वी आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात आला होता. यंदाच्या संमेलनात समकालीन पुस्तकांवर चर्चा, मान्यवर लेखकांच्या मुलाखती, सरस्वती सन्मानप्राप्त साहित्यिकांची विशेष उपस्थिती, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकारांशी शालेय विद्यार्थ्यांचा संवाद, चाकोरीबाहेरील विषयांवर परिसंवाद आयोजित करून संमेलन जास्तीत जास्त साहित्य, पुस्तक आणि वाचककेंद्री करण्यात यश मिळाले.
स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले, एक तपाहून अधिक काळ पाठपुरावा केल्यानंतर सातारच्या भूमीला शतकपूर्व संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला याचा आनंद आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून उत्तमोत्तम साहित्यिक उपक्रम, ग्रंथचळवळी तसेच मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा प्राप्त व्हावा याकरिता सर्वतोपरी प्रयत्न सातारकरांनी केले आहेत. साहित्यविषयक कार्याचा वारसा जपत शतकपूर्व संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार करून आम्ही सातारकरांनी सर्व प्रकारच्या माध्यमातून प्रयत्न केले. समाजमाध्यमांद्वारे संमेलन देश-विदेशातील साहित्यप्रेमींपर्यंत पोहोचविण्यासाठी रॉकलाईक टेकव्हेंचर्स यांच्या माध्यमातून ३१ तज्ज्ञांची खास यंत्रणा उभारली गेली. साईराज भोसले यांनी समन्वय केले. ४८० पेक्षा अधिक क्रिएटर्सनी कोलॅब्रेशनची भूमिका निभावली. याचे फलित म्हणून फेसबुक, ट्विटर, यू-ट्यूब, इन्स्ट्राग्राम आदी समाजमाध्यमांद्वारे तब्बल साडेसात कोटी साहित्यप्रेमींनी संमेलनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि संमेलन अटकेपार नेऊन यशस्वी केले.
वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे, सकस साहित्याची निर्मिती होत नाही, नव्या लेखकांचे साहित्य वाचकांपर्यंत पोहोचत नाही अशी नकारात्मक चर्चा असताना सातारा येथे आयोजित केलेले शतकपूर्व संमेलन या सर्व चर्चांना छेद देणारे ठरले असून वाचक, लेखक, साहित्यप्रेमी यांना संमेलनाच्या मांडवात आणण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले गेले.स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, स्वागताध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य संमेलन
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी ज्या प्रमाणे विविध समित्या स्थापन करून आयोजनाला दिशा दिली गेली त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग करत संमेलन देश-विदेशातील साहित्यप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे. ज्या प्रमाणे थोरल्या शाहू महाराज यांच्या कार्यकाळात मराठीचा झेंडा अटकेपार रोवला गेला तीच परंपरा साहित्य क्षेत्रात पुढे नेत संमेलन सातासमुद्रापार नेण्यात यश लाभले आहे.विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य संमेलन
साहित्य संमेलनाची देदीप्यमान परंपरा जपत नावीन्यपूर्ण साहित्यिक उपक्रमांद्वारे शतकपूर्व संमेलन अधिक साहित्य, पुस्तक आणि वाचककेंद्री करण्याचा निर्धार केला होता. साहित्य संमेलनास लाभलेला विक्रमी प्रतिसाद बघता निर्धार पूर्णत्वास गेला आहे, असे ठामपणे सांगावेसे वाटते. जुन्या परंपरांची कास धरत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिकाधिक साहित्यप्रेमींपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालेले हे संमेलन पुढील साहित्य प्रवासासाठी पथदर्शी ठरले आहे.प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ

